रमाई आवास योजनेंतर्गत नवी घरकुले बांधण्यासाठी निधीच नाही!
वार्ताहर/ खेड
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंबांसाठी सुरू करण्यात आलेली रमाई आवास योजना सध्या निधीअभावी अडचणीत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या योजनेसाठी निधीच उपलब्ध न झाल्याने तालुक्यातील 608 कुटुंबांच्या घराचे स्वप्न अधुरेच राहणार आहे. तरी या योजनेच्या घरकुलांसाठी निधी त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी होऊ लागली आहे.
ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील आर्थिकदृष्टय़ा गरीब कुटुंबांना सरकारच्या वतीने घरे बांधून देण्यात येतात. शंभर टक्के अनुदानातून घर बांधून देण्यासाठी 1 लाख 20 हजार रूपये लाभार्थ्याला दिले जातात. घरकुल बांधण्यास प्रारंभ केल्यापासून ते पूर्ण होईपर्यंत चार हप्त्यांमध्ये ही रक्कम देण्यात येते. ही योजना ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील बेघर व गरिबांसाठी राबवण्यात येते. या योजनेतून 269 चौरस फुटाचे घर बांधण्यासाठी रक्कम देण्यात येते. या योजनेमुळे अनेक गरिबांना घराचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होत आहे. तालुक्यातील 608 कुटुंबांचे घरकुलांचे प्रस्ताव पाठवण्यात आले असून ते मंजूर करण्यात आले आहेत. मात्र या घरांना निधी उपलब्ध झालेला नाही. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रमाई आवास योजनेतील या कुटुंबांना घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही काळ तरी थांबावेच लागणार आहे









