प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हा रूग्णालयात उपचार घेणाऱया राजापूर तालुक्यातील कोंड येथील प्रौढाचे शुक्रवारी उपचारादरम्यान निधन झाले. या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे अतिरीक्त शल्य चिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी नातेवाईकांना कळवले. मात्र काही तासातच अहवाल निगेटीव्ह असल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी गोधळ घालत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने मृतदेह दोन दिवस शवागृहातच ठेवण्याची वेळ आली. अखेर राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी माणुसकी जपत शनिवारी रत्नागिरीत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. यानिमित्ताने सिव्हील प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा समोर आला आहे.
23 जून रोजी राजापूर कोंड येथील पती-पत्नी सिव्हीलमध्ये ताप असल्याने दाखल झाले होते यावेळी या दोघांचेही स्वॅब घेण्यात आले. 24 रोजी पत्नीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह तर पतीचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. मात्र या दोघांनाही ताप असल्याने त्यांना कोरोना आयशोलेशन ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी संबंधित निगेटीव्ह आलेल्या व्यक्तीचे उपचारादरम्यान निधन झाले, यावेळी नातेवाईकांना माहिती देण्यात रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची देण्यात आल्याने दोनच नातेवाईक सिव्हीलमध्ये कोंड येथून दाखल झाले, यावेळी पुन्हा त्यांना डॉ.चव्हाण यांनी त्याचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत, नजरचुकीने पॉझिटीव्ह सांगण्यात आल्याची माहिती नातेवाईकांना दिली. यानंतर नातेवाईकांचा चांगलाच पारा चढला, आम्ही नेमके कोणावर विश्वास ठेवायचे गावात सगळय़ांना पॉझिटीव्ह रिपोर्ट आल्याची माहिती देण्यात आली, आता तुम्ही निगेटीव्ह कसे सांगता? गावातील लोकांना आम्ही उत्तर काय द्यायचे आमच्यावर संशय व्यक्त करण्यात येईल अशा प्रश्नांचा भडीमार नातेवाईकांनी डॉ.चव्हाण यांच्यासमोर केला.
नातेवाईकांची व्दिधा मनस्थितीत झाली होती, कारण सकाळी पती-पत्नीचे रिपोर्ट पॉझिटीव्ह म्हणून सांगण्यात येते नंतर नाही सांगितले जाते त्यामुळे नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार दिला. त्यानंतर नातेवाईकांनी राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे यांच्या कानावर संपूर्ण विषय सांगितला, सचिन शिंदे व त्यांचे सहकारी सिव्हीलमध्ये गेले, यावेळी डॉ.चव्हाण यांचा हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचे शिंदे यांनी सांगितले.
दोन दिवसापासून संबंधित व्यक्तीचा मृतदेह शवागृहात ठेवण्यात आला होता, रिपोर्ट निगेटीव्ह असल्याने शासकीय यंत्रणाही अंत्यसंस्कार करू शकत नव्हती, दुसरीकडे नातेवाईकांची संभ्रमावस्था अशा परिस्थितीत राजरत्न प्रतिष्ठानने पुढाकार घेत मृतदेह सर्व प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेतले, आणि येथील चर्मालय स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
सध्या रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयातच कोरोना चाचणी रिपोर्ट उपलब्ध होत असतानाही हा गोंधळ निर्माण झाल्याने कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न नातेवाईकांसमोर निर्माण झाला होता. यामध्ये नातेवाईकांची चूक नाही, मात्र हा मृतदेह किती दिवस शवागृहात ठेवायचा यामुळे सामाजिक बांधिलकीतून राजरत्न प्रतिष्ठानने जबाबदारी पार पाडली असली तरी या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने गांभिर्याने लक्ष घालावे.
गेल्या आठवडय़ात मुंबईतून एक महिला आपल्या 11 वर्षीय मुलगीला घेवून रत्नागिरीत दाखल झाली यावेळी आम्ही तिला स्वॅब देण्यासाठी सिव्हीलमध्ये नेले मात्र माहितीचा फॉर्म भरून घेण्यात आला एक-दोन तास तिला स्वॅब सेंटरच्या बाहेर ताटकळत बसावे लागले, स्वॅब घेण्याआधीच त्या महिलेच्या मोबाईलवर स्वॅब घेण्यात आल्याचा मेसेज आला, आम्ही सर्वजण समोरच होतो स्वॅब घेण्याआधीच असा मेसेज टाकण्यात कसा येतो याचा जाब आम्ही विचारल्यानंतर यंत्रणा गप्प होती संस्थात्मक कोरोंटाईनमधील लोक स्वॅब देण्यासाठी आली तेव्हा त्यांच्यासोबत या दोघींचे स्वॅब घेण्यात आले होते त्यानंतर हा हलगर्जीपणा घडला असून जिल्हाधिकारी यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी सचिन शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी केली आहे.









