प्रतिनिधी/ मडगाव
नेसाय येथील प्रशांत चिंचणीकर या 40 वर्षीय रुग्णाचे काल शनिवारी दुपारी मालभाट-मडगाव येथील व्हिक्टर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. सकाळी या रुग्णाला उपचारासाठी व्हिक्टर हॉस्पिटलमध्ये आणले होते. मात्र, दुपारी त्याची प्रकृती खालावल्याने त्याला गोमेकॉत नेण्यासाठी जी रुग्णवाहिका वापरात आणली तिला आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने, विलंब झाला व नंतर सुविधा उपलब्ध करून गोमेकॉत नेत असताना प्रकृती अधिक चिंताजनक बनली व वेर्णा येथून त्याला पुन्हा व्हिक्टर हॉस्पिटलमध्ये आणले असता, त्याचा मृत्यू झाला. या प्रकारावर मयताचे नातेवाईक प्रचंड संतप्त बनल्याने बराचवेळ तणाव निर्माण झाला.
मृत्यूचे कारण अस्पष्ट
प्रशांत चिंचणीकर याचा मृत्यू कोविडमुळे झाल्याचा संशय व्हिक्टर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी व्यक्त केला व त्याचा अहवाल स्वॅब चाचणीसाठी पाठविला. परंतु, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. प्रशांत एका खासगी डॉक्टराकडे उपचार घेत होता. काल शनिवारी सकाळी त्याला बरे वाटत नसल्याने खासगी डॉक्टराकडे नेण्यात आले. या डॉक्टरांने त्याला फातोडर्य़ातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यास सांगितले. मात्र, या ठिकाणी मुख्य डॉक्टर उपलब्ध नसल्याने, त्याला मडगावातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्यात आले. या खासगी हॉस्पिटलमध्ये त्याची तपासणी करण्यात आली असता, प्रकृती गंभीर बनू लागल्याने मालभाट-मडगाव येथील व्हिक्टर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. सकाळी दहाच्या दरम्यान, त्याला व्हिक्टर हॉस्पिटले आणले होते. या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू झाले, मात्र प्रकृती सुधारणा होण्याऐवजी ती खालावू लागल्याने, त्याला 11.45च्या दरम्यान गोमेकॉत हलविण्याचा निर्णय घेतला. यावेळी प्रशांतला श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्याला गोमेकॉत नेण्यासाठी सुसज्ज अशी रुग्णवाहिका हवी होती. व्हिक्टर हॉस्पिटलची रुग्णवाहिका सुसज्ज नव्हती. दुपारी रुग्णवाहिकेत एखाद्या चित्रपटात शोभावे अशा पद्धतीने व्हेंटिलेटर व इतर आवश्यक सुविधा बसविण्याचे काम सुरू झाले. तोपर्यंत बराच विलंब झाला होता. तसेच हॉस्पिटलाचे 40 हजारांचे बिल चुकते करेपर्यंत रुग्णाला थांबवून घेण्यात आले.
वेर्णातून रुग्णवाहिका माघारी फिरली
प्रशांतला घेऊन रुग्णवाहिका गोमेकॉकडे निघाली. मात्र, वाटेत वेर्णा येथे प्रशांतची प्रकृती प्रचंड खालावली व अर्ध्यावाटेवरून वेर्णा येथून रुग्णवाहिका पुन्हा मडगावला वळविण्यात आली. प्रशांतला पुन्हा क्हिक्टर हॉस्पिटलमध्ये आणले असता त्याला दुपारी 2.40 वा. मृत्यू आला. रुग्णवाहिकेत आवश्यक सुविधा उपलब्ध नव्हत्या तसेच गोमेकॉत पाठविण्यात विलंब लावल्यामुळे त्याचे नातेवाईक संतप्त झाले. अनेक नातेवाईकांनी व्हिक्टर हॉस्पिटलकडे धाव घेतली. यावेळी संयम तुटलेल्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेतील व्हेंटिलेटर तसेच इतर वस्तू अस्ताव्यस्त टाकल्या. तसेच हॉस्पिटलच्या दारातील शोभेच्या झाडाची कुंडी फोडून टाकली तसेच एक टेबल ही उलटून टाकले. नंतर पोलिसांना पाचारण करून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यानंतरही काही युवकांनी हॉस्पिटलाची गेट मोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश आले नाही.
मडगावचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांनी यावेळी संतप्त नातेवाईकांची समजूत घालताना 144 कलम जारी असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर अटक सत्र सुरू करावे लागणार असल्याची कल्पना दिली. त्यानंतर प्रकरण शांत झाले.
प्रशांत याच्या मागे पत्नी तसेच दोन लहान मुले, आई, तसेच तीन भाऊ असा परिवार आहे. आज रविवारी सकाळी 11 वा. मडगाव स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.









