शाळा व्यवस्थापन समित्यांचा अहवाल 26 पर्यंत येणार
दोन सत्रात शाळा सुरू ठेवण्याचा पर्याय
एका सत्र जास्तीत जास्त तीन तासांचे
शिक्षकांनी त्या गावातच राहण्याची अट
शाळेत फक्त विद्यार्थी, शिक्षकांनाच प्रवेश
प्रतिनिधी / सावंतवाडी:
‘कोरोना’मुळे मार्चपासून बंद ठेवण्यात आलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सर्व खबरदारी घेऊनच शाळा सुरू करण्यात येणार आहेत. या संदर्भात शाळा व्यवस्थापन समितीचा निर्णयही लक्षात घेण्यात येणार असून या संदर्भात जिल्हय़ात शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका सुरू आहेत. या समित्यांचा अहवाल प्रशासनाकडे 26 जूनपर्यंत आल्यानंतर हा अहवाल जिल्हाधिकाऱयांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी शाळा सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत.
कंटेनमेंट झोनमधील शाळा सुरू होणार नाहीत. जुलैपासून नववी, दहावी, बारावी, ऑगस्टपासून सहावी ते आठवी, सप्टेंबरपासून तिसरी ते पाचवी वर्ग सुरू होणार आहेत. तर पहिली व दुसरीचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीवर सोडण्यात आला आहे. शाळा सुरू करतांना स्वच्छतेबाबतची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे सोपविण्यात आली आहे. शासनाने डिजिटल शिक्षणावर भर दिला तरी पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर करू नये, असे निर्देश दिले आहेत. तर तिसरी ते पाचवीसाठी प्रतिदिन एक तास, सहावी ते आठवीसाठी प्रतिदिन दोन तास, नववी ते बारावीसाठी प्रतिदिन तीन तास डिजिटल शिक्षणाला परवानगी दिली आहे.
‘कोरोना’मुळे शाळा सुरू करण्याबाबत अनिश्चितता होती. परंतु जुलैपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाने निर्देश दिले आहे. टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करताना पुरेशी काळजी घेण्यात येणार आहे. त्या दृष्टीने शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत चर्चा घडवून या संदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हय़ात शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका होत असून तो अहवाल 26 जूनपर्यंत शिक्षण विभागाकडे आल्यानंतर तो जिल्हाधिकाऱयांकडे पाठविण्यात येणार आहे. ते अंतिम निर्णय घेणार आहेत.
आवश्यकता भासल्यास थर्मल स्क्रिनिंग
जुलैपासुन शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीने शिक्षण विभागाने युद्धपातळीवर हालचाली सुरू आहेत. शाळा सुरू करतांना सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याबरोबर दोन सत्रात शाळा सुरू करून एक सत्र जास्तीत जास्त तीन तासांचे ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. वेगवेगळय़ा वर्गाच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस सोडून शाळेत यावे, असे निर्देश आहेत. एका वर्गात 20 ते 30 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात येणार असून शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षक, विद्यार्थी यांच्या व्यतिरिक्त कुणालाही प्रवेश देण्यात येणार नाही. शिक्षक ज्या शाळेत शिकवत आहेत त्या गावातच शिक्षकाची राहण्याची सोय करण्याच्या सूचना आहेत. आरोग्य विभागाने आवश्यकता वाटल्यास विद्यार्थी आणि शिक्षकांचे थर्मल स्क्रिनिंग करण्याचे निर्देश दिले आहेत.
…तरीही भीती कायम
शासनाने दिलेल्या निर्देशानुसार शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाच्या हालचाली सुरू आहेत. सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे गेल्यानंतर निर्णय होणार आहे. परंतु शाळा जुलैपासून सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. मात्र, शाळा सुरू केल्या तरी ‘कोरोना’चे भूत कायम राहणार आहे. त्यात आता पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षण विभाग यांची कसोटी लागणार आहे. एखादा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.









