प्रतिनिधी/ गुहागर
गुहागर-विजापूर महामार्गांतर्गत शृंगारतळी ते मार्गताम्हाने दरम्यान हाती घेण्यात आलेले रुंदीकरणाचे काम पावसाळय़ापूर्वी पूर्ण न झाल्याने या मार्गावरील चिखली येथे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे अनेक वाहने घसरून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. काही वाहने चिखलामध्ये रुतल्याने त्यांना धक्का मारण्याची वेळ वाहनचालकांवर येत आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना महामार्गाला जोडून असलेल्या इतर मार्गांचे संपर्क रस्ते अनेक ठिकाणी बंद आहेत नव्या रस्त्याची ऊंची वाढल्याने मुख्य रस्त्यावरून गावाकडे जाणाऱया रस्त्यांवर जायचे कसे ही समस्या सध्या जोर धरू लागली आहे. शृंगारतळी ते मार्गताम्हानेपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण करण्याचे काम मनीषा कंस्ट्रक्शन यांनी घेतले आहे. पावसाळय़ापूर्वी हे काम पूर्ण करणार असा विश्वास देणाऱया या ठेकेदारांना प्रत्यक्षात रस्त्याचे काम पूर्ण करता आलेले नाही.
बहुतांशी भागाचे एकेरी कॉंक्रिटीकरण झाले आहे. मात्र भर पावसात काम होत असल्याने झालेल्या कामावर लगेच वाहनांची ये-जा सुरू करण्यात येत नाहीत. यामुळे दुसऱया साईटपट्टीला असलेला चिखल सध्या अपघातास कारणीभूत ठरत आहे. यादृष्टीने ठेकेदाराने कुठलीही खबरदारी घेतलेली दिसत नाही. विशेषकरून दुचाकीस्वारांना फार त्रास सहन करावा लागत आहे. लहान वाहने चिखलात रुतून बसल्याने प्रवाशांना गाडीला धक्का देऊन गाडी बाहेर काढण्याची वेळ येत आहे.
यामुळे चिखलीतील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यापूर्वी काही काळ रस्ता अडवून धरण्याची आंदोलनात्मक भूमिकाही त्यांनी घेतली होती. ठेकेदाराच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र सध्याची स्थितीही त्रासदायक असल्याने ग्रामस्थ पुन्हा आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत.









