सुशांत कुरंगी / बेळगाव
कोरोनाच्या वाढत्या धास्तीमुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे व्यवसायांना फटका बसून अनेकांची आर्थिक घडी विसकटली. लॉकडाऊन होऊन 3 महिने होत आले तरी अद्याप मॅक्सीकॅब व्यवसाय सुरू झालेला नाही. यामुळे बेळगाव जिल्हय़ातील 2 हजार 500 मॅक्सीकॅब चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मॅक्सीकॅब गाडीच्या चाकांबरोबरच आयुष्याची चाकेही थांबल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
परिवहन मंडळाच्या बसेसप्रमाणे प्रत्येक गाव-खेडय़ांपर्यंत मॅक्सीकॅब पोहोचली आहे. बेळगाव शहरातून जिल्हाभरात मॅक्सीकॅब पसरलेल्या आहेत. ज्या गावांना बस पोहोचत नाही, अशा गावांना मॅक्सीकॅब पोहोचलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मॅक्सीकॅब ही फायद्याची ठरते. परंतु हा व्यवसाय सध्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. तीन महिने झाले व्यवसाय सुरू नसल्याने वाहने विकण्याची वेळ यावर आधारित व्यावसायिकांवर आली आहे.
वाहने जरी घरी असली तर त्यांचा मेंटनन्सचा खर्च सुरूच आहे. एकाच जागी वाहने असल्यामुळे बॅटऱया खराब झाल्या आहेत. एका वाहनाला वर्षाला 36 हजार रुपये रोड टॅक्स तर 40 हजार रुपये इन्शुरन्स भरावा लागतो. मार्च, एप्रिल व मे महिन्यात लग्न व इतर समारंभांची भाडी मिळतात. परंतु यावषी हा हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे घरात राहून गाडीवर खर्च करण्याची वेळ आली आहे.
भाजी विकण्याची आली वेळ
गाडय़ा बंद असल्यामुळे या वाहनांवरील चालक व मालकांना इतरत्र काम करण्याची वेळ आली आहे. काहीजण भाजी विकत आहेत. तसेच काहीजण शेती, सेंट्रिंग व गवंडीकाम करत आहेत. मिळेल ती मजुरी घेऊन घरखर्च चालवावा लागत आहे. त्यामुळे सरकारने मॅक्सीकॅब सुरू करण्यास परवानगी देऊन आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी होत आहे.
या मार्गावर चालविल्या जातात मॅक्सीकॅब
बेळगाव शहरातून जिल्हय़ातील विविध खेडय़ांपर्यंत मॅक्सीकॅब चालविल्या जातात. खानापूर, कित्तूर, पारिश्वाड, खणगाव, नेसरगी, बेळगुंदी, गोकाक, संकेश्वर, निपाणी, राकसकोप, कोवाड, राजगोळी, कोंडूसकोप, तारिहाळ, गर्लगुंजी, येळ्ळूर, धामणे या गावांमध्ये जाण्यासाठी मॅक्सीकॅब चालविल्या जातात. साहित्य तसेच घरापर्यंत सोडत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचा मॅक्सीकॅबकडे ओढा असतो.
रिक्षाचालकांना अनुदान मग आम्हाला का नाही?
लॉकडाऊनच्या काळात रिक्षाचालकांना भाडी मिळालेली नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी राज्य सरकारने 5 हजार रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले. त्यांच्या सोबतच मॅक्सीकॅब व्यवसायही ठप्प असून त्याकडे मात्र राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आम्हाला अनुदान का नाही? असा प्रश्न रिक्षाचालक विचारत आहेत.
आर्थिक घडी कशी बसवायची?
राजेंद्र जैन (मॅक्सीकॅब चालक)
माझी टाटा मॅजिक मॅक्सीकॅब आहे. कॅब बंद असल्यामुळे गवंडी, सेट्रींग कामासह भाजी विकण्याची वेळ आमच्यावर आली आहे. व्यवसाय बंद असला तरी गाडीचा मेंटनन्स ठेवावा लागत आहे. तसेच सर्व टॅक्स भरावे लागणारच आहेत. त्यामुळे आर्थिक घडी कशी बसवायची, असा प्रश्न आमच्यासमोर असल्याचे त्यांनी सांगितले.
गाडय़ा विकून दुसरा व्यवसाय सुरू करण्याची वेळ
किशोर मासेकर (मॅक्सीकॅब चालक)
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मॅक्सीकॅब जाग्यावर आहेत. लग्न, बारसे, जत्रा यामुळे मिळणारी सर्व भाडी यावषी बंद आहेत. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर इतर व्यवसाय सुरू झाले पण मॅक्सीकॅब सुरू करण्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे गाडय़ा विकून दुसरा व्यवसाय सुरू करण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.









