प्रतिनिधी / कणकवली:
तालुक्यात मटका, जुगार व गोवा बनावटीच्या दारूची विक्री सुरू असून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हे निवेदन ठाणे अंमलदारांजवळ देण्यात आले. यावेळी उपतालुकाध्यक्ष अनंत आचरेकर, कासार्डे विभागीय अध्यक्ष दत्ताराम अमृते, कलमठ विभाग उपतालुकाध्यक्ष शांताराम सादये आदी उपस्थित होते.
तालुक्यात नांदगाव, कोळोशी, खारेपाटण, फोंडा, कणकवली, बोर्डवे, कासार्डे आदी भागात मोठय़ा प्रमाणात मटका व गोवा बनावटीच्या दारूची विक्री होत आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या साऱयाकडे कॉलेज तरुणांचा वर्ग मोठय़ा प्रमाणात वळताना दिसतो. संबंधितांवर आठवडाभरात कारवाई करावी अन्यथा मनसेच्यावतीने आंदोलन छेडून गुन्हेगारांना पकडून देण्यात येईल व त्याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल, असे या निवेदनात म्हटले आहे.









