सिंधुदुर्गातील लॅबमध्ये कोव्हिडबरोबरच लेप्टोस्पायरोसीस, डेंग्यू, विषमज्वर, काविळ यासारख्या आजारांचे निदान होणार आहे. आता वैद्यकीय महाविद्यालय व सुसज्ज असे सर्व सेवा रुग्णालय पूर्णत्वास गेल्यास कोकणी जनतेला आरोग्य सेवेसाठी धावाधाव करावी लागणार नाही.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोव्हिड-19 च्या प्रयोगशाळा झाल्या आहेत. आरोग्य सुविधा सक्षम बनविण्याच्या दृष्टीने लॅब होणे, ही मोठी अचिव्हमेंट आहे. सिंधुदुर्गातील प्रयोगशाळेमध्ये तर कोव्हिडबरोबरच लेप्टोस्पायरोसीस, डेंग्यू, विषमज्वर, काविळ यासारख्या आजारांचे निदानही होणार आहे. आता वैद्यकीय महाविद्यालय व सुसज्ज असे सर्व सेवा रुग्णालय उभारण्याचे पाऊल टाकले आहे. ते पूर्णत्वास गेल्यास कोकणी जनतेला आरोग्य सेवेसाठी धावाधाव करावी लागणार नाही.
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे ग्रामीण जिल्हे आहेत. या दोन्ही जिल्हय़ात आरोग्य सुविधांची तशी वानवाच आहे. त्यामुळे तर आजपर्यंत विविध आजारांच्या संकटांचा सामना करावा लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात तर लेप्टोस्पायरोसीस आणि माकडताप आजाराच्या मोठय़ा संकटांचा सामना करावा लागला आहे. कोरोनापेक्षाही या आजाराचे जास्त लोकांचे बळी गेले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत चारजणांचे बळी गेले आहेत. मात्र गेल्या 5-6 वर्षांत लेप्टो व माकडतापामुळे 50 हून अधिक लोकांचे बळी गेले आहेत.
माकडतापाचे रुग्ण दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक आढळले. लेप्टोचे तर जिल्हय़ात ठिकठिकाणी रुग्ण आढळत असतात. लेप्टो असेल किंवा माकडताप, डेंग्यू या आजाराचे रुग्ण दगावले. याचे कारण वेळीच उपचार झाले नाहीत आणि वेळीच उपचार न होण्याचे कारण म्हणजे वेळीच निदान झाले नाही. कारण सिंधुदुर्ग जिल्हय़ात प्रयोगशाळा नाही. माकडतापाच्या निदानासाठी मणिपाल हॉस्पिटल किंवा पुणे, मिरज येथे रक्त नमुने पाठविले जात होते. रक्त नमुन्यांचा अहवाल येण्यास 8-8 दिवस जात होते. त्यामुळे तो येईपर्यंत उशीर होऊन उपचार करण्यासही विलंब होत होता. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे हे ग्रामीण जिल्हे. त्यामुळे या जिल्हय़ाकडे राज्यकर्त्यांचे आरोग्याच्या दृष्टीने दुर्लक्षच झाले होते. परंतु लेप्टो व माकडतापानंतर संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोना विषाणूचे संकट कोकणातही उभे राहिले आणि लॅब उभारण्याच्या हालचाली गतिमान झाल्या.
कोकणातील दोन्ही जिल्हय़ात प्रयोगशाळा नसल्याने दोन्ही जिल्हय़ांना कोरोना नमुना तपासणीसाठी कोल्हापूर व सांगली-मिरज या जिल्हय़ांवर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय नाही. त्यातही कोल्हापूर व मिरज येथील प्रयोगशाळेमध्ये कामाचा मोठा व्याप असल्याने कोरोना तपासणी अहवाल येण्यास उशीरच होत होता. 4-4 दिवस अहवालांची प्रतीक्षा करावी लागत होती. त्यामुळे संशयित रुग्ण हे पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे समजत नव्हते. त्यामुळे ते रुग्ण इतर लोकांशी संपर्कात येऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका वाढत होता. रत्नागिरी जिल्हय़ात तर याचा मोठा परिणाम झाला आणि या जिल्हय़ात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 500 पर्यंत गेली. सिंधुदुर्गात मोठा प्रादुर्भाव नसला, तरी कोरोना बाधितांची संख्या 166 वर गेली आहे. कोरोनासारखे संकट ओढावलेले असताना राज्यकर्ते प्रयोगशाळा सुरू करीत नाहीत, उदासिनता दाखवून लोकांच्या जिवाशी खेळत आहेत, असे आरोप होऊ लागले. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोव्हिड-19 लॅब मंजूर केली. स्थानिक प्रशासनाच्या तत्परतेमुळे ती सुरूही झाली. दोन्ही जिल्हय़ात एवढय़ा लवकर लॅब होतील, अशी शक्यता कमी वाटत असतानाही सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर तसेच रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी तत्परता दाखविल्यामुळे अल्पावधीत लॅब सुरू झाल्या. या लॅबमुळे कोरोना नमुना तपासणी वेळोवेळी होऊन कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. कोकणी जनतेचे आरोग्यमान सुधारण्यासाठी, आरोग्य सुविधा सक्षम बनविण्याच्या दृष्टीने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे.
दोन्ही जिल्हय़ांमध्ये कोव्हिड-19 लॅब झाल्या आहेत. परंतु, सर्वात जमेची बाजू म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हय़ात झालेल्या या लॅबमध्ये कोरोना नमुना तपासणीबरोबर माकडताप, लेप्टोस्पायरोसीस, डेंग्यू व इतर आजारांच्या तपासण्या होणार आहेत. मात्र या लॅबसाठी मंजूर असलेला स्टाफ भरणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत जिल्हय़ातीलच टेक्निशियन कर्मचाऱयांना प्रशिक्षण देऊन प्रयोगशाळा चालवली जात आहे. परंतु, ही तात्पुरती व्यवस्था आहे. कायमस्वरुपी स्टाफ भरला, तरच ही प्रयोगशाळा सुरू राहणार आहे. तसेच दोन्ही जिल्हय़ात डॉक्टरांच्या जागा मोठय़ा प्रमाणात रिक्त आहेत. सर्व सोयींनी युक्त हॉस्पिटल नाही, ही मोठी कमतरता आहे. ती भरून काढण्यासाठी दोन्ही जिल्हय़ात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सुसज्ज असे सर्व आरोग्य सेवा देणारे रुग्णालय उभारण्याचे पाऊल टाकले आहे. दोन्ही जिल्हय़ांच्या लॅबच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू करू, असे सूतोवाच केले आहे. त्याचा पाठपुरावा सत्ताधारी पक्षातील आमदार आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी केला, तर भविष्यात कोकणात आरोग्य सुविधा निर्माण होतील आणि गोवा, कोल्हापूर, मुंबई येथे धावाधाव करावी लागणार नाही. जिल्हय़ातच आरोग्य सेवा मिळू शकतील. यासाठी मेडिकल कॉलेज होण्याची आश्वासने हवेतच न विरता प्रत्यक्षात झाल्यास कोकणी जनतेचे आरोग्यमान अधिक उंचावेल.
संदीप गावडे








