महत्त्वाचे शैक्षणिक निर्णय
- नववी, अकरावी नापास विद्यार्थीही पास
- सर्व शिक्षकांना शाळेत येणे आता सक्तीचे
- सर्व अभ्यासक्रम पुन्हा शाळेत शिकविणार
- दिवाळी, नाताळ, अन्य सुटय़ांमध्ये कपात
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय 15 जुलैनंतर घेण्यात येईल. सर्व शिक्षकांना शाळेत येणे आता सक्तीचे आहे. नववी व अकरावी इयत्तेत नापास झालेल्यांची पुरवणी परीक्षा रद्द करण्यात आली असून त्यांना पास करण्यात आले आहे. सध्याचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन शिक्षण हे सक्तीचे नाही, सर्व अभ्यासक्रम पुन्हा शाळेत शिकवला जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
शाळा व नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत मुख्याध्यापक संघटना, प्राचार्य फोरम, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक, पालक-शिक्षक संघाचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेतली. त्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय 15 जुलैनंतर घेण्याचे एकमताने ठरवण्यात आले आहे. सर्व शाळांच्या सर्व शिक्षकांना शाळेत येणे आता सक्तीचे असून त्यांनी विविध प्रकरची कामे करावीत. त्यासंदर्भातील परिपत्रक शिक्षण खाते लवकरच जारी करणार असल्याचे ते म्हणाले.
नववी, अकरावीचे नापास विद्यार्थीही पास
नववी व अकरावी इयत्तेत नापास होणाऱयांसाठी आवश्यक असणारी पुरवणी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नववीच्या आणि अकरावीच्या सर्व मुलांना पास करून दहावी, बारावीत नेण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू होणार असल्यामुळे दिवाळी, नाताळ व इतर सर्व सुट्टीत कपात केली जाणार आहे. त्याची माहिती त्या-त्या वेळी परिपत्रक काढून शिक्षण खात्यातर्फे देण्यात येणार आहे.
देणगी मागणाऱया शाळांवर होणार कडक कारवाई
ऑनलाईन शिक्षण, प्रवेश तसेच सॅनिटायझेशनसाठी जर कोणती शाळा देणगी मागत असेल तर त्याची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिला. या प्रकरणी शिक्षण खाते, शिक्षण सचिव किंवा आपल्या कार्यालयात तक्रार नोंदवावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी केले.
सर्व अभ्यासक्रम शाळेत शिकविला जाईल
ऑनलाईन किंवा ऑफलाईन शिक्षण हे सक्तीचे नाही, असे स्पष्ट करून मुलांनी पालकांवर स्मार्ट फोनसाठी तगादा लावू नये. सर्व अभ्यासक्रम शाळेत शिकवण्यात येणार असून ते शिक्षकांसाठी बंधनकारक आहे. गोव्यात ग्रामीण भागात 100 टक्के इंटरनेट जोडणी मिळत नाही. त्यामुळे त्यासाठी मुलांनी, पालकांनी धडपडू नये. झाडावर, डोंगरावर, गच्चीवर चढू नये. सध्या काही शाळा ऑनलाईन शिकवत असल्यातरी तरी ते सर्वांपर्यत पोहोचतेच असे नाही. ज्यांना अभ्यासक्रम चुकत असेल त्यांना तो शाळेत शिकवला जाईल.
शिक्षणासाठी पंधरा दिवसांत टेलिकॉम धोरण
सुमारे 11000 शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणासाठी प्रशिक्षित केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. दुरदर्शन किंवा एखाद्या चॅनेलवरून शिक्षण मिळावे म्हणून विचार सुरू असून राज्यातील 12 तालुक्यातून ते देण्याच्या पर्यायावर बोलणी सुरू आहे. ज्या भागात इंटरनेट जोडणी मिळत नाही तेथे ती मिळावी म्हणून प्रयत्न करण्यात येत असून येत्या 15 दिवसात त्यासंदर्भात काहीतरी टेलिकॉम धोरण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.