निवडणूक अधिकारी विशालाक्षी यांची घोषणा : सात जागांपैकी भाजप 4, काँग्रेस 2, निजदच्या एका उमेदवाराची निवड
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य विधानसभेवरून विधानपरिषदेच्या 7 जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध झाली आहे. सदर 7 जागांसाठी 29 जून रोजी निवडणूक होणार होती. मात्र, सात जागांसाठी सातच उमेदवारांनी अर्ज केल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, अशी घोषणा विधानसभेच्या सचिव तथा निवडणूक अधिकारी विशालाक्षी यांनी केली.
निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या 7 जागांसाठी सोमवार दि. 29 रोजी निवडणूक जाहीर केली होती. 7 जागांसाठी भाजपकडून चार, काँग्रेसकडून दोन आणि निजदकडून एका उमेदवाराने अर्ज दाखल केला होता. विधानसभेच्या सचिव तथा निवडणूक अधिकारी एम. के. विशालाक्षी यांनी उमेदवारी अर्जांची छाननी केली. त्यावेळी सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. तसेच 22 जून अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे 7 जागांसाठी 7 उमेदवार निवडणून रिंगणात असल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे.
विधानपरिषदेच्या सात जागांसाठी भाजपतर्फे एमटीबी नागराज, प्रतापसिंह नायक, आर. शंकर, सुनील वल्यापुरे, काँग्रेसतर्फे नासीर अहमद, बी. के. हरिप्रसाद आणि निजदतर्फे गोविंदराजू यांची बिनविरोध निवड झाली आहे.









