वार्ताहर / दिघंची
आटपाडी तालुक्यात ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच कायद्याचा दुरुपयोग करून काही समाजकंटक समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत. त्यांची चौकशी करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय मराठा सेवा संघ व मराठी क्रांती मोर्चा यांच्यावतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांना देण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासकीय अनुदान लाटण्याचा उद्देशाने खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत अशी चर्चा आहे. तसेच काही सामाजिक संघटना व राजकीय पक्षाचे स्वयंघोषित नेते आपली दुकानदारी चालवण्यासाठी समाजा- समाजात द्वेष पसरवून शांतता भंग करत आहेत. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच दिघंची येथील लोकनियुक्त सरपंच ,उपसरपंच पती व बहुजन समाजातील इतर सोळा जणांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या केसेसची सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर शरद पवार,गौरीहार पवार ,हनुमंत मोरे ,जयेंद्र मोरे, अजित कदम ,शुभम कदम, फारूक मुलाणी, गणेश लोहार ,सुनील मोरे ,सिद्धेश्वर पाटोळे, संदीप बाबर ,विजय शिंदे, विशाल म्हेत्रे आदींच्या सह्या आहेत.