खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची खगोल प्रेमींना पर्वणीच
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये खंडग्रास पध्दतीच्या सूर्यग्रहणाला 10 वाजून 3 मिनिटांनी सुरूवात झाली. 11 वाजून 39 मिनिटांनी ढगांच्या लपाछपीत सूर्यग्रहणाचे दर्शन झाले. साडेबारा ते सवाएकपर्यंत ढग जात येत होते. पण सूर्यग्रहण सुटताना ढग बाजूला झाल्याने जिल्हय़ातील खगोलप्रेमींना खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची पर्वणीच मिळाली. दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी खंडग्रास सूर्यग्रहण सुटले. ग्रहणाचा कालावधी 3 तास 25 मिनिटे व 31 सेकंद ऐवढा होता. टेलिस्कोपच्या सहाय्याने खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याचा उत्साह खगोलप्रेमींच्या चेहऱयावर ओसंडून वाहत होता.
जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱया स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणाऱया स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. रविवारी या वर्षांतील पहिले खंडग्रास सूर्यग्रहण महाराष्ट्रात पाहायला मिळाले. संपूर्ण महाराष्ट्रात खंडग्रास सूर्यग्रहण तर देहरादूनमध्ये कंकनाकृती सूर्यग्रहणाचे दर्शन झाले. गतवर्षी केरळमधील पायणूर शहरात कंकनाकृती सूर्यग्रहण दिसले होते. आता 2034 म्हणजेच तब्बल 14 वर्षांनी कंकनाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. शिवाजी विद्यापीठाने पन्हाळा येथील आवकाश संशोधन केंद्रामध्ये खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची व्यवस्था केली होती. शहरात विवेकानंद कॉलेज, खगोलप्रेमी वसंत गुंडाळे यांच्यासह शहरातील अनेक कुटुंबियांनी आपआपल्या घराच्या छतावरून खंडग्रास सूर्यग्रहण पाहिले. खगोलप्रेमींनी खंडग्रास सूर्यग्रहणाची विविध दृश्ये कॅमेराबध्द करून सोशल मिडीयावर शेअर केली आहेत.
पुढील तीनही ग्रहण भारतात दिसणार नाहीत
विवेकानंद महाविद्यालयात अत्याधुनिक दुर्बिनीच्या माध्यमातून खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची व्यवस्था केली होती. यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्य शुभांगी गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. या वर्षातील 5 जुलै रोजी सकाळी छायाकल्प चंद्रग्रहण तर 30 नोव्हेंबर रोजी दुपारी चंद्रग्रहण आणि 14 डिसेंबर रोजी रात्री सूर्यग्रहण आहे. त्यामुळे भारतात यापुढील तिनही ग्रहण दिसणार नाहीत.
डॉ. मिलिंद कारंजकर (विवेकानंद कॉलेज)
सूर्यग्रहण काळातील आवकाशातील बदलाचा अभ्यास करणार
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने पन्हाळा येथील आवकाश संशोधन केंद्रामध्ये सूर्यग्रहण पाहण्याची व्यवस्था केली होती. पन्हाळय़ावर सुरूवातील पूर्णपणे खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळाले. मध्यंतरी 11 वाजून 38 मिनिटांनी ढगाळ वातावरण झाल्याने शेवटपर्यंत सूर्यग्रहण पाहता आले नाही. 21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस, या दिवशी झालेले हे खंडग्रास सूर्यग्रहण होते. इस्त्रोने दिलेल्या इंडियन नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम आयआरएनएसएस/नाविक) या उपकरणाच्या सहाय्याने सूर्यग्रहण काळात आवकाशात होणाऱया बदलांचा अभ्यास करणार आहे.
डॉ. राजीव व्हटकर (शिवाजी विद्यपीठ, अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक.