ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
तणावग्रस्त परिस्थितीत चीनकडून कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्यास त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी लेह आणि श्रीनगर एअरबेसवर लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत. एअरफोर्सने सुखोई-३० एमकेआय, मिराज २००० आणि जॅग्वार मोक्याच्या ठिकाणी तैनात केले आहेत. या ठिकाणांहून अत्यंत कमी वेळात उड्डाण करुन कोणतेही ऑपरेशन करता येईल.
हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी लेह, लडाख आणि श्रीनगरचा दोन दिवस दौरा केला या दौऱ्यात त्यांनी सध्यपरिस्थिती आणि तयारीचा आढावा घेतला. सीमेजवळच्या तळांवर सुखोई-३० एमकेआय, मिराज २००० आणि जॅग्वारसारखी लढाऊ विमाने तैनात असल्यामुळे चीनने केलेल्या कृतीला जशास तसे उत्तर देता येईल. जमिनीवर कामगिरी करणाऱ्या जवानांसाठी अपाचे हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लडाखच्या गलवान सीमेवरील हिंसक संघर्षानंतर देमचोक आणि प्यांगॉग लेक जवळील सर्व गावे रिकामी करून नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. चीनजवळ 3400 किमी दूरपर्यंत नियंत्रण रेषेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.









