आयएसएलचे आगामी मोसमासाठी नवे नियम, दोन डेव्हलपमेंटल खेळाडू घेणेही सक्तीचे
कोलकाता
इंडियन सुपर लीगने स्पर्धेत सहभागी होणाऱया क्लब्सकरिता 2020-21 या मोसमासाठी नवी नियमावली तयार केली असून प्रत्येक क्लबने आपल्या संघात एका आशियाई खेळाडूचा समावेश करणे सक्तीचे केले आहे.
या स्पर्धेचे संयोजक फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेड (एफएसडीएल) यांनी सर्व क्लब्सना आयएसएल खेळाडूंची मार्गदर्शक सूची दिली असून प्रत्येक संघाने प्रत्येक सामन्यात 2000 नंतर जन्मलेल्या दोन डेव्हलपमेंटल खेळाडूंना 18 सदस्यीय संघात सामील करण्याची सक्तीही केली आहे. आयएसएलमध्ये सध्या पाच विदेशी खेळाडूंना सामील करून घेण्याची परवानगी असून त्यात आता एक आशियाई खेळाडू त्यांना घ्यावा लागणार आहे. याशिवाय पुढील मोसमापासून प्रत्येक क्लबला आपल्या संघात किमान 25 व कमाल 35 खेळाडू घेता येणार आहेत. मागील मोसमापर्यंत ही मर्यादा जास्तीत जास्त 25 खेळाडूंची होती. पण युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. आता प्रत्येक क्लबला आशियाई खेळाडूसह किमान 5 व कमाल 7 आंतरराष्ट्रीय खेळाडू घ्यावे लागणार आहेत तर स्थानिकांपैकी 18 ते 30 खेळाडू त्यांना घेता येणार आहेत. 18 जणांच्या संघात दोन डेव्हलपमेंटल खेळाडूंना सामील करणे हे अतिशय सकारात्मक पाऊल असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.
आगामी मोसमासाठी खेळाडूंना देण्यात येणाऱया मानधनाची 16.5 कोटी रुपये मर्यादा प्रत्येक क्लबसाठी ठेवण्यात आली आहे. या सर्व नियमावलीला एआयएफएफच्या तांत्रिक समिती बैठकीत मंजुरी देण्यात आली. आयएसएलचा आगामी मोसम नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे. पण कोरोना महामारीची त्यावेळची परिस्थिती पाहून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.









