ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आम आदमी पार्टीच्या कालकाजी विधानसभेच्या आमदार आतिशी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. आतिशी यांची 16 जून रोजी कोरोना टेस्ट करण्यात आली होती. सध्या आतिशी यांच्यामध्ये काही प्रमाणात लक्षणे आढळली असून त्यांनी स्वत:ला स्वत:च्या घरात क्वारंटाइन केले आहे.
दरम्यान, दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन आजारी असून बुधवारी त्यांची पुन्हा एकदा कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. सत्येंद्र जैन यांना सोमवारी रात्री ताप आल्याने आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर लगेचच त्यांनी कोरोना चाचणी देखील करण्यात आली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र दुसऱ्या टेस्टचे रिपोर्ट अजून आलेले नाही आहेत.
तसेच मागच्या आठवड्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची देखील प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट केली गेली तर यात त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.









