प्रतिनिधी / कोल्हापूर
लोकसभा निवडणुकीनंतर विस्तापित झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मंगळवारी राष्ट्रवादीच्या कोटय़ातून आमदारकी स्वीकारली. शेतकरी नेत्याला चांगले व्यासपीठ मिळल्याचा स्वाभिमानी शेतकर्यांना आनंद होईल, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्याच एकेकाळच्या सहकार्यांकडून कडवट शब्दात टीकेचे आसूड ओडले जावू लागले आहेत. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जय शिवराय किसान संघटनेचे संस्थापक शिवाजीराव माने यांनी शेट्टी यांच्यावर थेट निशाणा साधला. तर, स्वाभिमानचे माजी जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी ही आमदारकी म्हणजे सोन्याचा पिजरा असल्याची बोचरी टीका केली आहे. राजू शेट्टी यांच्यावर शेतकरी नेत्यांकडूनच अशा टीका होवू लागल्याने स्वाभिमानी कार्यकर्ता चलबिचल झाला आहे.
महायुतीतून बाहेर पडल्यानंतर राजू शेट्टी यांनी काँग्रेस आघाडीशी जुळवून घेतले. ज्यांच्या विरोधातील लढय़ासाठी स्वाभिमानीचा जन्म झाला त्यांच्याच पंक्तिला चळवळ बांधली या आरोपाचाही शेट्टी यांना सामना करावा लागला. यातूनच पंजाबराव पाटील, सदाभाऊ खोत, विजय भोजे, शिवाजीराव माने, बी. जी. पाटील, भगवानराव काटे या बिनीच्या शिलेदारांनी शेट्टी यांची साथ सोडली. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसला. राष्ट्रवादीची संगत शेट्टी यांना महागात पडली. मात्र पराभवानंतर शेतकर्यांनीच पराभव केला अशी भावना शेट्टींच्या समर्थकांमध्ये तयार झाली. गेल्या दीड वर्षात शेतकर्यांवर अनेक प्रसंग ओढवले मात्र शेतकरी नेते असलेले राजू शेट्टी आक्रमक दिसले नाहीत किंवा सरकारच्या धोरणा विरोधात आंदोलन हाती घेतले नाही. शेतकर्यांच्या प्रश्नावर राजू शेट्टी गप्प का असा सवालही उपस्थित होत गेला. मात्र याचे खरे उत्तर मंगळवारी मिळाले. अशा शब्दात अन्य शेतकरी नेत्यांकडून टीका होवू लागली आहे. आमदारकीसाठी शेट्टींनी स्वाभिमान विकला असा थेट आरोप जय शिवराय किसान संघटनेने केला आहे.
चळवळीचा इतिहास रचलेल्या बारामतीत शेट्टींची शरनागती
चळवळीचा इतिहास रचलेल्या बारामतीत आमदारकीसाठी शेट्टींना शरण जावे लागले. त्यांनी आमदारकीसाठी स्वाभिमान विकला असून सामान्य कार्यकर्त्यांच्या निष्ठेची त्यांनी चेष्टा केली. स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी साखर सम्राटांच्या गुंडांनी कार्यकर्त्यांना मारहाण केली, खोटे गुन्हे दाखल केले. हे कार्यकर्ते आजही कोर्टाच्या चकरा मारत आहेत. ज्या राष्ट्रवादी बरोबर आज पर्यंत स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी संघर्ष केला त्याच पक्षाच्या नेत्यांच्या दारात पदासाठी राजू शेट्टींनी जावं ही सर्व सामान्य कार्यकर्त्यांची शोकांतिका असल्याची टीका जय शिवराय किसान संघटनेचे संस्थापक शिवाजीरा माने यांनी पत्रकात केली आहे.
माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही शेलक्या शब्दात शेट्टींचा समाचार घेतला आहे. मी शेतकर्यांच्यासाठी असलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला बारामतीला गेल्यानंतर शेट्टींनी माझ्यावर टीका केली होती. मग मंगळवारी ते गोविंद बागेत कशासाठी गेले होते. दत्तकपत्र स्वीकारायला गेले होते का असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला आहे. शेतीमालाला दर नाही. शेतकरी उदवस्त झाला आहे. शेतकर्याला कर्ज मिळत नाही. अनेक अडचणी त्याच्यासमोर आहेत. असे असतान शेट्टी गप्प का या प्रश्नाचे उत्तर बारामतीच्या भेटीतून शेतकर्यांना मिळाले आहे. तरीही मी त्यांचे सभागृहातील सहकारी म्हणून स्वागत करेन आता तिथेतरी त्यांनी शेतकर्यांशी प्रामाणीकपणा दाखवावा असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादीची आमदारकी सोन्याचा पिंजरा
राष्ट्रवादीकडून आमदारकी घेणे म्हणचे सोन्याचा पिंजरा तो सोन्याचा असला तरी पिंजराच आहे. त्याच कुलूप आणि किल्ली बारामतीकरांच्या हातात असणार आहे. अशी टीका स्वाभिमानीचे माजी जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी केली आहे. ही आमदारकी चळवळ वाढवण्यासाठी नसून चळवळीचा बंदोबस्त करणारी आहे. असे काटे यांनी म्हटले आहे.