प्रतिनिधी / वास्को
मंगळवारी दिवसभरात पावसाने वास्को परीसरात जोरदार वृष्टी केली. मेर्सीस वाडे भागातील काही घरांना या पावसाचा बराच फटका बसला. एका कारवरही झाड कोसळले. अन्य काही पडझडीच्या घटना घडल्या. मात्र, विशेष नुकसानीच्या घटना घडल्या नाहीत.
मंगळवारी पहाटेपासून वास्को परीसरात पावसाने जोरदार वृष्टी केली. दिवसभरात बराच पाऊस कोसळला. रात्रीही यात खंड पडला नव्हता. काही प्रमाणात वारेही वाहत होते. त्यामुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडले. वास्कोतील ओरूले बेलाबाय येथील एक झाड पार्क केलेल्या कारवर कोसळल्याने त्या कारचे जवळपास पंचवीस हजारांचे नुकसान झाले. पाऊस व वाऱयाच्या घटनांमुळे काही पडझडीच्या घटना घडल्याने संध्याकाळपर्यंत वास्कोतील अग्नीशामक दलाला पाच ठिकाणी धाव घेऊन अडथळे दूर करावे लागले.
मेर्सिस वाडे भागातील घरांमध्ये पावसाचे पाणी
दरम्यान, वास्कोतील मेर्सिस वाडे भागात यंदाही अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी घुसण्याच्या घटना घडल्या. या भागात असलेला प्रमुख नाला झाडा झुडपांनी आणि कचऱयांने भरलेला असून या नाल्याची योग्य प्रकारे सफाई झालेली नसल्याने पाणी वाहून जाण्याऐवजी अडत असून पावसाळी पाणी येथील शेतजमीनीत भरते व शेवटी लोकांच्या घरांमध्ये शिरते अशा स्थानिक लोकांच्या तक्रारी आहेत. दरवर्षी येथील नाल्याच्या प्रश्नामुळे या भागातील काही घरांना पाण्याचा धोका सहन करावा लागतो. या भागातील काही कुटुंबांना मंगळवारी पाण्यामुळे आपापली घरे खाली करावी लागली. तर अन्य पर्याय नसलेल्या काहींनी त्याच स्थितीत दिवस काढला. पाऊस धो धो पडत राहिल्यास या भागातील अन्य कुटुंबांवरही संकट येण्याची शक्यता लोकांमध्ये व्यक्त होत आहे. या भागातील नाला पूर्ण भरून वाहात आहे. काही ठिकाणी जमीनीच्या पातळीवर आलेला आहे.









