24 तासांत 7 रुग्णांचा मृत्यू : 317 नव्या बाधितांची भर : 322 संसर्गमुक्त
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असतानाच बाधितांच्या मृत्यूचा आकडा शतकासमिप येऊन पोहोचला आहे. मागील 24 तासांत राज्यात 7 कोरोना रुग्णांचे बळी गेले आहेत. त्यात बेंगळूरमधील पाच जणांचा समावेश आहेत. याच दरम्यान, मंगळवारी दिवसभरात 317 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 322 जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात कोरोनाचे रुग्ण संसर्गमुक्त होण्याचे प्रमाण अधिक असले तरी दुसरीकडे पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत पुन्हा मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. तसेच मृत्यूमुखी पडणाऱयांची संख्याही सातत्याने वाढत आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 2,976 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 72 जण आयसीयुमध्ये आहेत. तीन दिवसांपूर्वी हा आकडा 20 च्या आत होता. आता त्यात मोठी भर पडल्यामुळे मृतांची संख्या आणखी वेगाने वाढण्याचे संकेत मिळाले आहेत.
मंगळवारी राज्यात 317 नवे रुग्ण आढळले असून त्यातील 108 रुग्ण परराज्यातून तर 78 रुग्ण हे विदेशातून आले आहेत. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 7,530 इतकी असून त्यापैकी 4,456 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत 94 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर चार बाधितांचा अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांमध्ये बेंगळूरमध्ये 5, रामनगर आणि बिदर जिल्हय़ात प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यातील पाचजण 60 वर्षावरील आहेत तर दोघे 50 वर्षाच्या आतील आहेत.
गुलबर्ग्यानेही पार केली हजारी
गुलबर्गा जिल्हय़ात 63 नव्या रुग्णांची भर पडली असून येथील एकूण रुग्णसंख्या 1007 इतकी झाली आहे. त्यामुळे उडुपीनंतर रुग्णसंख्या 1 हजार पार करणारा गुलबर्गा हा राज्यातील दुसरा जिल्हा ठरला आहे. मंगळूरमध्ये 79, बळ्ळारीत 53, बेंगळूर शहरमध्ये 47, धारवाड 8, उडुपी आणि शिमोगा प्रत्येकी 7, यादगिर व रायचूरमध्ये प्रत्येकी 6, हासन 5, विजापूर, म्हैसूर, रामनगर व गदग जिल्हय़ात प्रत्येकी 4, बेळगावमध्ये 3, बिदर 2 तसेच तुमकूर जिल्हय़ात 1 नवा रुग्ण आढळून आला आहे.
तीन परिचारिका कोरोना पॉझिटिव्ह
बेंगळूरमधील व्हिक्टोरिया इस्पितळ कोविड इस्पितळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथील तीन परिचारिकांना संसर्ग झाला आहे. तिघांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांच्या स्वॅबची तपासणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर या इस्पितळातच विलगीकृत करून उपचार केले जात आहेत. सोमवारी इएसआय इस्पितळातील एका कर्मचाऱयाला कोरोनाची लागण झाली होती.









