सेन्सेक्स 376.42 तर निफ्टी 100 अंकांनी तेजीत
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील पहिल्याच दिवशी सोमवारी कोविड 19 च्या चिंतेमुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. परंतु यामध्ये काही प्रमाणात दिलासा मिळत दुसऱया दिवशी मंगळवारी शेअर बाजारात मात्र जागतिक पातळीवरील सकारात्मक वातावरणामुळे शेअर बाजार सावरला असल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवसभरातील व्यवहारात एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिस यांच्या समभागाच्या जोरावर ही स्थिती प्राप्त करता आली आहे.
दुसऱया दिवशी मंगळवारी सेन्सेक्स 376 अंकांनी वाढत जात बंद झाला आहे. यामध्ये भारत आणि चीन यांच्या सीमेवरील तणाव वाढत गेल्याच्या बातम्यांनी मात्र काही प्रमाणात खालच्या पातळीवर पोहोचला होता. परंतु याही कालावधीत शेअर बाजाराने नुकसान भरपाई करत तेजी मिळवली. दिवसअखेर सेन्सेक्स 376.42 अंकांनी वधारुन निर्देशांक 33,605.22 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 100.30 अंकांनी वधारुन निर्देशांक 9,914.00 वर बंद झाला.
दिग्गज कंपन्यांमध्ये दिवसभरात एचडीएफसी बँकेचे समभाग सर्वाधिक चार टक्क्यांनी वधारले असून यामध्ये आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, कोटक बँक आणि हिरो मोटोकॉर्प यांचे समभाग फायद्यात राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, ऍक्सिस बँक आणि आयटीसीचे समभागांमध्ये घसरण झाली आहे.
अन्य घडामोडींमध्ये अमेरिकेच्या केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेक कंपन्यांना चालना देण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. याच घटनेचा सकारात्मक परिणाम देशातील शेअर बाजारावर झाल्याचे दिसून आले आहे. इतर बाजारांमध्ये आशियामधील चीनचा शांघाय कम्पोजिट, हाँगकाँगचा हँगसेंट, जपानचा निक्की आणि दक्षिण कोरियाच्याही शेअर बाजारात तेजी पहावयास मिळाली.








