कोरोनाने साऱया जगासह इये मराठीचिये नगरी देखील धुमाकूळ घातला आहे. तो चोरपावलाने देशात आला. मग लॉकडाऊन झाले. तेही परत निघाले. पण कोरोनाच्या जाण्याची चिन्हे नाहीत. सरकार थकलेले दिसते. शास्त्रज्ञ काय करतील ते खरे, तोवर जे जे होईल ते ते बघावे आणि सहन करावे अशी मनाची अवस्था आहे. या अवस्थेत साहित्यातल्या पूर्वसुरींचे स्मरण होते.
अत्रे किंवा पु. ल. आज असते तर त्यांनी आपल्याला धीर दिला असता आणि थोडी भाषिक धमाल देखील उडवली असती. “असा हरामखोर व्हायरस गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही,’’ अशी गर्जना करणाऱया अत्र्यांनी महाराष्ट्राला बदनाम करणाऱया नेत्यांना देखील (पूर्वी पाटील वगैरे नेत्यांना ठोकले तसे) ठोकून काढले असते, यात शंका नाही. पुलंनी सॅनिटायझरवर किंवा कोरोनावर एखादी दर्जेदार कोटी केली असती आणि व्हॉट्सअपवीरांनी ती सर्वत्र स्वतःच्या नावांनी फॉरवर्ड केली असती. साक्षात पुलंनाच कोणीतरी ती स्वतःच्या नावाने पाठवली असती आणि पुलंनी कपाळावर हात मारून घेतला असता.
“सॅनिटायझर लावून हात स्वच्छ करतो ते ठीक आहे, पण व्हॉट्सअप विद्यापीठातल्या तमाम विद्वानांच्या मेंदूवर जो इनसॅनिटायझरचा शेंदूर बसला आहे, ती पुटं कोणी खरवडायची,’’ असा त्यांना प्रश्न पडला असता. त्यांच्या कथेतल्या बसची आणि म्हशीची टक्कर होते तेव्हा मास्तरांनी त्या होमिओपॅथिक डॉक्टरला “म्हशीला चालते का हो तुमचे आर्सेनिक आल्बम?’’ हा भाबडा प्रश्न नक्की विचारला असता. जावईबापू मुंबईला निघालेत असं समजल्यावर भल्या पहाटे अंतू बर्वा त्यांना निरोप द्यायला आला असता आणि म्हणाला असता, “मुंबईला निघालात असं समजलं, डोक्मयात किडा आला. मास्क लावून जाणार की कसे?’’
“मास्क लावून.’’
“हे चांगलं केलंत. तुमचं संरक्षण मास्कमुळे आहे हो. अजून एक… तुमचा विश्वास नाही, ठाऊक आहे मला. पण एवढय़ा दोन पुडय़ा असू द्या तुमच्या खिशात. एकीत विश्वेश्वराचा अंगारा आहे, दुसरीत आर्सेनिक आल्बम आहे. दोन पुडय़ा जड नाहीत खिशाला.’’
आणि वपुंच्या रसिक नायकाने नायिकेला भेटायला जाताना झब्ब्यावर आठवणीने अत्तराचे आणि सॅनिटायझरचे दोन दोन थेंब लावले असते. ‘चिअर्स’ करताना म्हणाला असता, “एक थेंब सॅनिटायझरचा, बाकीचे अपेटायझरचे.’’








