ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन मध्ये महाराष्ट्रात बंद असणाऱ्या शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. ऑनलाईन आणि डिजिटल पद्धतीने प्रायोगिक तत्त्वावर शाळा सुरू करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिक्षण विभागासोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक आयोजित केली होती. या बैठकीला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या देखील उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीत या बैठकीत शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

तसेच ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही त्या ठिकाणी प्रत्यक्ष शाळा सुरू केल्या जातील असे ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले मात्र, ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आहेत त्या ठिकाणी शाळा सुरू होणार नाहीत असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच शाळा सुरू करण्यासाठी तयार करण्यात आलेली मार्गदर्शक तत्वे देखील जाहीर करण्यात आली आहेत.
या मार्गदर्शक तत्वानुसार, पहिली व दुसरीची मुले लहान असल्याने त्यांना ऑनलाईन ऑनलाईन पर्याय उपलब्ध नसेल. तसेच रेड झोन नववी, दहावी आणि बारावीची शाळा, कॉलेज जुलै पासून सुरु करण्यात येतील. तसेच सहावी ते आठवी ऑगस्ट मध्ये, तिसरी ते पाचवी सप्टेंबरमध्ये सुरू केले जातील.
त्याच बरोबर शाळेत विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी एक दिवस आड वर्ग भरवण्याचीही मुभा देण्यात आली असून शाळा सुरू करण्यापूर्वी त्यांनी सॅनिटायझेशन करणे बंधनकारक असणार आहे. तसंच प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी बसवण्याची अट आहे. शिक्षक, विद्यार्थ्यांना मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. शाळा सुरु करताना परिस्थितीचा आढावा घेऊनच करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देखील शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.









