प्रतिनिधी/ बेळगाव
इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडल्यानंतर त्यामध्ये केंद्र सरकार 5 हजार रूपये जमा करत आहेत. अशी अफवा मागील महिन्याभरापासुन बेळगाव शहर व ग्रामीण भागात पसरली आहे. यामुळे नागरीक तासनतास रांगा लावून पोस्ट कार्यालयात खाते काढण्यासाठी गर्दी करीत आहेत. शनिवारी देखील अशाचप्रकारच्या अफवेमुळे भर पावसात नागरीकांनी गर्दी केली होते. पोस्ट कर्मचाऱयांकडून ही अफवा असल्याचे सांगूनही नागरीक मात्र खाते काढण्यासाठी आग्रह धरत होते.
लॉकडाऊन नंतर केंद्र सरकारने आर्थिक मदत व्हावी यासाठी जनधन खात्यामध्ये 500 रूपये जमा केले. ज्या महिलांनी जनधन खाते उघडली होती. त्यांच्या खात्यावर प्रत्येक महिन्याला ही रक्कम जमा होत गेली. परंतु ज्यांनी जनधन खाते उघडले नव्हते त्यांनी पोस्टामध्ये जाऊन झीरो रूपये अकाऊंट काढण्यास सुरूवात केली. हे खाते काढल्यानंतर त्यामध्ये 5 हजार रूपये जमा होणार असल्याची अफवा पसरल्यामुळे गर्दीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत गेली.
नागरीकांनी आपल्या सोबतच आपल्या मुलांचेही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत खाती काढली आहेत. खाते काढण्यासाठी सकाळी 9 वाजल्यापासूनच नागरीक रांगा लावत आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागातून मोठय़ा प्रमाणात महिला खाते काढण्यासाठी येत आहे. दिवसभर शेतातील कामे थांबवून या महिला खाते काढण्यामध्ये वेळ घालवत आहेत. यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. पोस्ट कर्मचाऱयांकडून ही अफवा असल्याचे नागरीकांना सांगण्यात आले. तरीही नागरीक खाते काढण्याचे आग्रह धरीत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे.









