वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विदेशात होणाऱया लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय क्रिकेटपटूंना सहभागी होण्यासाठी भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (बीसीसीआय) परवानगी द्यावी, असे वैयक्तिक मत भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने व्यक्त केले आहे.
विदेशातील लीग क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी देशातील क्रिकेटपटूंनी भारतीय क्रिकेट मंडळाकडे परवानगीसाठी अर्ज दाखल करण्याची पद्धत अंमलात आणावी. या प्रक्रियेतील क्रिकेटपटूंना विदेशातील लीग स्पर्धेत खेळण्याची बीसीसीआयने परवानगी द्यावी. देशातील ज्या क्रिकेटपटूंशी मंडळाने मध्यवर्ती करार केलेला नाही. तसेच त्यांची राष्ट्रीय संघात निवड झालेली नाही अशा क्रिकेटपटूंना भारतीय क्रिकेट मंडळाने विदेशातील लीग क्रिकेट स्पर्धामध्ये खेळण्याची परवानगी द्यावी, असे हरभजनने म्हटले आहे. मंडळाकडून यासाठी काही नियम अंमलात आणले जावेत. 35 वर्षांवरील किंवा 50 पेक्षा अधिक कसोटी सामने खेळणाऱया क्रिकेटपटूला मंडळाकडून परवानगी दिली जावी, असेही तो म्हणाला. हरभजन आपल्या क्रिकेट कारकीर्दीत कसोटीमध्ये 417 बळी नोंदविले आहेत.









