ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसने सत्ता गमावली ते सध्या कोरोनाबाधित असल्याने दिल्लीच्या रुग्णालयात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या आठवडय़ात पंतप्रधान मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. कोरोनामुळे झालेल्या जीवित आणि वित्तहानीची जबाबदारी कोणाची हा हळूहळू कळीचा मुद्दा बनत चालला आहे.
आल्प्रेड हिचकॉकच्या हॉरर फिल्मसारखा कोरोनाचा विषाणू पसरतच चालला आहे. त्याच्या ‘क्रोज’ या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे कावळे सगळीकडे पसरले आहेत. भयावह पद्धतीने पसरले आहेत. जणू काही पिंड खाण्यासाठी ते अधीर झाले आहेत. सरकारकडून समूह संक्रमण होत असल्याचा वारंवार इन्कार होत असला तरी काही तज्ञ मंडळी मात्र देशाच्या काही शहरी भागात अशी लागण सुरू झाल्याचे ठामपणाने सांगत आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी तर पुढील दोन महिन्यात देशाच्या राजधानीत रुग्णांची संख्या 5.5 लाखाच्या वर जाईल असे अंगाचा थरकाप उडवणारे भाकित वर्तवले आहे. अधिकृत लोक अनधिकृतपणे असा अंदाज व्यक्त करत आहेत की किमान एक वर्ष तरी देशाला या महामारीशी झुंजावे लागणार आहे.
कोरोनाचे रुग्ण गल्लीपासून दिल्लीपर्यंत पुढील 2-3 महिन्यात पसरणार असे सांगितले जात असताना सामान्य नागरिक धास्तावला आहे, विशेषतः दाटीवाटीच्या शहरातील तर अधिकच. आपला कोणी वाली नाही अशी भावना त्याच्यात वाढीस लागली आहे. स्मशानघाटावरील वाढती गर्दी आणि सरकारी इस्पितळातील बेदिली तो बघत आहे. खाजगी इस्पितळे तर गिधाडासारखी वागत आहेत अशा बातम्यांनी तो हादरला आहे. टाळी आणि थाळी वाजवणे आता त्याला भंपकपणा वाटू लागला आहे. पंतप्रधानांपासून सर्व लहानथोर नेत्यांचा एक प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष स्पष्ट संदेश आहे. ’तुमचे तुम्हालाच याच्यातून वाचायचे आहे. सांभाळून राहा. म्हातारी-कोतारी आणि मुले घरी राहा. बाहेरच्या हवेलाही लागू नका.’
सध्या सर्वच राज्यातील राज्यकर्त्यांचे मुख्य काम म्हणजे कोरोनाशी मुकाबला करणे असल्याने सत्ताधाऱयांना मजाच येत नाही आहे, सत्ता चाखताच येत नाही आहे. सर्व विकासकामांचे बारा वाजले आहेत आणि लहानथोर सर्वच मंत्र्यांचे गाजत वाजत निघणारे दौरे इतिहासजमा झालेले आहेत. प्रत्येक नेता आपल्याला रोगाची लागण होऊ नये म्हणून धडपडत आहे. सत्ताधारी भाजप असो अथवा पाप्याचे पीतर झालेला काँग्रेस…सगळेच जण प्रसारमाध्यमांपासून तसेच जनतेपासून दोन हात दूर राहूनच बोलत आहेत. झूम टेक्नॉलॉजीद्वारे पत्रकार परिषद घेतली जात आहे तर गेल्या आठवडय़ात अशा पद्धतीने गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीहूनच व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बिहारमधील निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. जे काही ऐकतो आणि बघतो आहोत ते सारे विचित्रच आणि काल परवापर्यंत अकल्पनीय.
कोरोना विरुद्धच्या या लढाईत सर्वोच्च न्यायालयाने कितीही फैलावर घेतले असले तरी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आतून तरी आपण शांत आहोत असे दाखवत आहेत. केजरीवाल असो अथवा महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे. सध्या कोणीही केंद्राशी पंगा घेण्याच्या मूडमध्ये नाही. कारण या लढाईत त्यांना सध्या केंद्राकडून जास्तीत जास्त मदत आणि संसाधने हवी आहेत. ती किती मिळत आहेत अथवा नाही हा भाग वेगळा, पण या विषाणू विरुद्धच्या लढाईत ‘आपण सारे 105’ असा आव ते सध्या आणत आहेत.
या महामारीपासून कधी सुटका मिळणार याची कोणालाच शाश्वती नसल्याने सर्वांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडात लपवून ठेवली आहेत. महाभारताचे युद्ध 18 दिवस चालले होते तर कोरोनाविरुद्धचे महायुद्ध 21 दिवसात आपण जिंकू असे पंतप्रधानांनी मार्च 25 ला पहिली टाळेबंदी जाहीर केली तेव्हा देशाला आश्वस्त केले होते हे विरोधक विसरलेले नाहीत.सिसोदिया यांनी केलेला दावा किती बरोबर अथवा चूक हे काळच दाखवेल. पण दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने राजधानीतील परिस्थिती पुढे बिघडली तर त्याला सर्वस्वी केंद्र सरकार आणि भाजप जबाबदार राहील असे भासवण्याची खेळी खेळली आहे. दिल्लीमधील रुग्णालये फक्त दिल्लीच्या रहिवाशांकरता असायला पाहिजेत असा आग्रह केजरीवाल यांनी धरला होता त्या प्रस्तावाला नायब राज्यपालांमार्फत भाजपने सुरुंग लावला. पुढील वषी विधानसभा निवडणूक असलेल्या बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जीवर मात करण्यासाठी त्यांच्या सरकारने कोरोनाशी ठीकपणे मुकाबला चालवलेला नाही अशी मोहीम भाजपने सुरू केली आहे.
त्याचबरोबर वादग्रस्त नागरिकता दुरुस्ती कायद्याला भाजपने तब्बल तीन महिन्यानंतर परत पोतडीतून बाहेर काढले आहे. बंगालमध्ये हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. राज्यपाल जगदीप धनकरदेखील आपल्या कृतींनी राज्य सरकारला अडचणीत आणत आहेत. बिहारमध्ये स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री नितीशकुमार अडचणीत आलेले असताना भाजप मात्र वेगळेच राजकारण करू लागला आहे की काय अशी शंका सत्ताधारी संयुक्त जनता दलाचे लोक व्यक्त करत आहेत. लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी भाजप मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेईल त्याबरोबर राहीन असे जाहीरपणे विधान करून सत्ताधारी आघाडीत खळबळ माजवून दिली आहे. या नोव्हेंबरपर्यंत राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. तामिळनाडूमधील वाढत्या रुग्ण संख्येने विरोधी पक्ष द्रमुकला पुढील वर्षाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचाराला चांगले हत्यार मिळाले आहे तर मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या गृहराज्य गुजरातमधील कोरोनाची वाढ आणि रुग्णातील वाढता मृत्यू दर भाजपला सतावत आहे.
मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार उलथवून मुख्यमंत्री झालेल्या शिवराजसिंग चौहान यांना आता विधानसभेच्या 22 पोटनिवडणुकांना सामोरे जायचे आहे. या पोटनिवडणुकात भाजपला टक्कर देण्यासाठी माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग कामाला लागले आहेत. देशात लोकशाही जगवायची असेल तर काँग्रेसमधील या दलबदलूंना आपटा असा प्रचार दिग्विजयनी सुरू केला आहे. त्याअगोदर होत असलेल्या राज्यसभा निवडणुकात दिग्विजयना पाडण्यासाठी भाजप खेळी खेळत आहे. गमतीची गोष्ट म्हणजे ज्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसने सत्ता गमावली ते सध्या कोरोनाबाधित असल्याने दिल्लीच्या रुग्णालयात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या आठवडय़ात पंतप्रधान मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. कोरोनामुळे झालेल्या जीवित आणि वित्तहानीची जबाबदारी कोणाची हा हळूहळू कळीचा मुद्दा बनत चालला आहे.
सुनील गाताडे








