कराची / वृत्तसंस्था
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी स्वतः आफ्रिदीनेच ट्वीटरवर याची माहिती दिली. या घातक विषाणूचा संसर्ग झालेला तो पहिला अव्वल क्रिकेटपटू ठरला.
‘गुरुवारपासून मला अस्वस्थता जाणवत होती. अतिशय वेदना जाणवत होत्या. चाचणी घेतली आणि दुर्दैवाने मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. मी लवकर स्वस्थ होण्यासाठी प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे’, असे ट्वीट आफ्रिदीने केले.
शाहिद आफ्रिदीने 1996 ते 2018 या कालावधीत पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व केले असून यात 27 कसोटी (1716 धावा, 48 बळी), 398 वनडे (8064 धावा, 395 बळी) व 99 टी-20 सामने (1416 धावा, 98 बळी) त्याने खेळले आहेत. वास्तविक, आफ्रिदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्त झाला आहे. पण, स्थानिक स्तरावर आताही तो खेळत राहिला असून मार्चमध्ये पाकिस्तान सुपर लीगमध्ये मैदानावर दिसून आला.
आफ्रिदीची समाजकार्यात सातत्याने व्यस्त राहिला असून त्याची स्वतःची सामाजिक मदतसंस्था देखील आहे. कोव्हिड-19 च्या उद्रेकानंतर तो समाजकार्यासाठी अनेक ठिकाणी धावून गेला. कोव्हिड झाल्याची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर संदेशांना जोरदार सुरुवात झाली. आफ्रिदी लवकर बरा होवो, अशा आशयाचे संदेश मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, कमरान अकमलसह अन्य काही क्रिकेटपटू व पाकिस्तान क्रिकेट मंडळाने देखील पोस्ट केले.
पाकिस्तानमध्ये कोरोनाचा बराच उद्रेक
शेजारी राष्ट्र पाकिस्तानमध्ये कोरोनाचा बराच उद्रेक झाला असून शाहिद आफ्रिदीला झालेली लागण हे त्याचे ताजे उदाहरण आहे. आणखी एक माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू तौफिक उमर हा देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. पण, या महिन्याच्या प्रारंभी तो त्यातून सावरला आहे. पाकिस्तानमधील 2 प्रथमश्रेणी खेळाडूंनाही कोरोनाची लागण झाली असल्याचे दिसून आले असून लेगस्पिनर रियाझ शेखचे त्यामुळे निधन झाले. जाफर सर्फराज (वय 50) यांचे देखील एप्रिलमध्ये पेशावर येथे कोरोनामुळेच निधन झाले.









