प्रतिनिधी / सातारा :
सातारा शहरानजिक शाहूपुरी येथील हेकेखोर कोरोना बाधित रुग्ण याच्याबद्दल स्थानिकांनी लेखी तक्रार केली होती. पण पोलिसांनाही या हेकेखोराने जुमानले नाही. आता मात्र तो कोरोना बाधित निष्पन्न झाल्याने पंधरा दिवसांनंतर जिल्हा प्रशासनाला जाग आलेली आहे. पंधरा दिवसांपूर्वी त्या अर्जाची गांभीर्याने दखल घेतली असती तर ही वेळ आलीच नसती हे वास्तव असून पोलिसांसह शाहूपुरी ग्रामपंचायत देखील स्वस्थ बसली होती. परंतू लेखी अर्जावर जर कारवाई झाली असती, तर आज ही वेळ आलीच नसती, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
याबाबत माहिती अशी की, गंगासागर कॉलनी, शाहूपुरी येथे 54 वर्षीय व्यक्ती एका बंगल्यात राहत असून त्याच्याकडे अनेक अनोळखी लोक व वाहने येत असतात. या लोकांचा त्या बंगल्यात सारखा वावर असून त्याठिकाणी पाटर्य़ाही झोडल्या जातात, अशी तक्रार दि. 10 मे रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात लेखी स्वरुपात स्थानिकांनी दिली होती. या अर्जाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना माहितीसाठी पाठविल्यानंतर त्याच दिवशी दुपारी पीसीआर वाहन आले. या वाहनातील पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या बंगल्याचा दरवाजा ठोठावला. मात्र या बेरकी व्यक्तीने त्या पोलिसांनाही दाद दिली नाही. त्यानंतर काल संबंधित व्यक्तीची कोरोना तपासणी केल्यानंतर ही व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झालेय.
दरम्यान, संबंधित व्यक्ती मुंबईतील शासकीय कर्मचारी असून मुंबईच्या खासगी हॉस्पिटलमध्ये त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. मात्र तेथून तो पळून आला व शाहूपुरीतील गंगासागर कॉलनीतील बंगल्यात येवून राहिला होता. कोरोना व्हायरस स्थिती त्याची ही कृती अत्यंत बेजबाबदारीची होती अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये सुरु होती. गुरुवारी सकाळी सर्व यंत्रणा तातडीने गंगासागर कॉलनीमध्ये दाखल झाल्या. पंचायत समिती सदस्य संजय पाटील, माजी सरपंच भरत भोसले, ग्रा. पं. सदस्य नवनाथ जाधव, मुग्धा पुरोहित, शोभा केंडे व फवारणी कर्मचाऱयांनी कर्तव्यदक्षतेने फवारणीचे काम केले. मात्र, गेली पंधरा दिवस याकडे शासकीय पातळीवर दुर्लक्ष झाल्याने शाहूपुरीकरांवर पुन्हा एकदा प्रतिबंधित होण्याची वेळ आलेली आहे.









