बीसीसीआयची सशर्त मान्यता असल्याचा लंका मंडळाचा दावा
मुंबई
भारतीय क्रिकेटरसिकांना आपल्या खेळाडूंना ऍक्शनमध्ये पाहण्यासाठी आणखी दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. येत्या ऑगस्टमध्ये भारतीय संघ लंका दौऱयावर जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या दौऱयात मर्यादित षटकांचे सामने खेळविले जाणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
‘द आयलंड’मधील वृत्तानुसार, या दौऱयासाठी बीसीसीआयने मान्यता दिली आहे. मात्र केंद सरकारने परवानगी दिली तरच हा दौरा होईल, असे त्यांनी सांगितल्याचे लंका क्रिकेटने स्पष्ट केले आहे. लंका मंडळानेही या मालिकेसाठी राष्ट्रीय क्रीडा मंत्रालयाकडून परवानगी मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. या मालिकेत 3 वनडे व 3 टी-20 सामने खेळविले जाणार आहेत. वेळापत्रकाप्रमाणे हा दौरा जूनमध्ये होणार होता. लॉकडाऊनमध्ये घालण्यात आलेले बरेचसे निर्बंध शिथिल करण्यात आले असल्याने लंकेतील पर्यटन उद्योग पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे लंका सरकारकडून या दौऱयाला निश्चितच परवानगी मिळेल, अशी मंडळला खात्री वाटत आहे. कोरोनामुळे जगभरातील क्रीडा क्षेत्र ठप्प झाले असून अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महसुलाच्या दृष्टिकोनातून लंकेसाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असून टीव्ही प्रक्षेपण हक्कांतून त्यांना हा महसूल मिळणार आहे.
आशिया चषक टी-20 स्पर्धा लंकेतच होणार असल्याचे लंका क्रिकेटचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी सांगितले. एसीसीने यासाठी परवानगी दिल्यानंतर त्यांनी हे जाहीर केले. ही स्पर्धा पाकिस्तान येत्या सप्टेंबरमध्ये संयुक्त अरब अमिरातमध्ये आयोजित करणार होते. पण पीसीबीने स्पर्धा बदलून घेण्याची दिलेली ऑफर लंका क्रिकेटने मान्य केल्याने आता ही स्पर्धा लंकेत होणार आहे. त्यामुळे 2022 मध्ये होणाऱया आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकला मिळणार आहे. या स्पर्धेत सहा संघांचा सहभाग असून पाच पूर्ण सदस्य (भारत, पाक, लंका, बांगलादेश, अफगाण) व एक पात्रता फेरीतून आलेला संघ त्यात सहभागी होतील. भारत या स्पर्धेचा विद्यमान विजेता आहे.









