बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला 21 वा वर्धापन दिन रक्तदान आणि अन्य सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला. 21 वर्षांचा टप्पा ओलांडणे सोपे नाही. शरद पवार यांचा पक्ष म्हणून त्याची राज्यात आणि देशात ओळख आहे. 21 पैकी 16 वर्षे राज्यात थेट सत्तेत. आणि पवारांना केंद्रात कर्तृत्व गाजवायची संधी. गत 5 वर्षे भाजपला पाठिंबा देऊन अप्रत्यक्ष सत्ता आणि त्याचा मोठा फटका. त्यामुळे महाविकास आघाडीचा जन्म ही या बंडखोर पक्षाची पूर्वपीठिका. तरुण नेत्यांची खाण हे शक्तीस्थळ. 21 वर्षानंतर वळून पाहिले तर राष्ट्रवादी हा शरद पवार यांच्या विचारांचा नव्हे तर शरद पवार यांचाच पक्ष बनून राहिला आहे. सामूहिक नेतृत्वाच्या नावाखाली पवारांच्या पाठोपाठ कोणतेही एकमुखी नेतृत्व तयार न होणे हे राष्ट्रवादीपुढचे सर्वात मोठे आव्हान आहे. राष्ट्रवादीबद्दल मराठय़ांमध्ये जशी विश्वासार्हता आहे तशी विश्वासार्हता दलित, ओबीसी, मुस्लिम समाजात निर्माण होत नाही पण त्यांचा पवारांवर बराच विश्वास असतो. पवारांवर विश्वास पण पक्षावर अविश्वास हे राष्ट्रवादीपुढचे आणखी एक मोठे आव्हान आहे. या पक्षातील नेते सत्तेत असल्यावर चमकून दिसतात, सत्तेच्या विरोधात जाण्याला घाबरतात. प्रसंगी पक्षत्याग करून सत्तेच्या वळचणीला प्राधान्य देतात ही या पक्षाची मोठी शोकांतिका आहे. पवार घराण्याबाहेरचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोडले तर इतर कोणत्याही नेत्याने शरद पवारांकडचा सत्तेच्या बाहेर असतानाही चमकून उठण्याचा आणि आपले आव्हान कायम ठेवण्याचा गुण आत्मसात केल्याचे दिसून येत नाही. काँग्रेसबरोबर सत्तेत असताना त्यांनी आणि भाजपनेही जयंत पाटील यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला मात्र त्यासाठीच्या दबावाला ते झुकले नाहीत. मात्र अशीच कामगिरी विजयसिंह मोहिते पाटील किंवा पद्मसिंह पाटलांचे कुटुंबही करू शकले नाही. सत्तेच्या प्रकाशात आज राष्ट्रवादीतील अनेक मंत्री चमकत आहेत मात्र विरोधी पक्ष म्हणून भूमिका वठवायची वेळ आली त्या वेळेला हे सगळे तारे लुप्त झाले होते. राष्ट्रवादीतील बलदंड नेत्यांपेक्षा काँग्रेसमधील मूठभर नेत्यांनी आपापल्या ताकतीवर आपला विभाग-मतदारसंघ सांभाळला. पक्षाचे आव्हान टिकवू शकले. राष्ट्रवादीला चर्चेत ठेवायला आणि आव्हान टिकवून राहायलासुद्धा शरद पवार यांनाच प्रयत्न करावे लागले होते. 2014 साली भाजपच्या सत्तेला बाहेरून पाठिंबा देणे राष्ट्रवादीला महागात पडले असून मुस्लिम, दलित आणि ओबीसींना हा आपलाच विश्वासघात वाटला हे वेगळे सांगायला नकोच. 2019 च्या निवडणुकीपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी निम्म्यापेक्षा जास्त राष्ट्रवादी खिळखिळा करून टाकला होता. पवारांच्या जिद्दीमुळेच पक्षाचे आव्हान कायम राहिले. मात्र त्यातही चर्चेच्या फेऱयात दम न निघालेल्या अजितदादांनी फडणवीसांशी हातमिळवणी करून औटघटकेचे सरकार स्थापन केले. हा एक मोठाच ठपका राष्ट्रवादीवर यापुढे कायम ठेवला जाणार आहे. एकीकडे केंद्रात सीएए, एनआरसी अशा मुद्यांवर संसदेत उत्कृष्ट भाषण करून पक्षाची प्रतिमा उंचावणाऱया सुप्रिया सुळे यांची प्रगल्भता आणि दुसरीकडे सत्तेत आल्यानंतरच उजळून उठणाऱया दादांची प्रतिमा यांची तुलना होतच राहते. त्याचवेळी पुरुषप्रधान भासणाऱया या पक्षाला महिला नेतृत्व पचेल का असाही प्रश्न पडतो. राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग हा शरद पवार यांचा पुलोद नंतरचा राजकारण बदलवणारा प्रयोग आहे. सोनिया गांधी आणि शिवसेना यांना एकत्र आणणे, शंका दूर करण्यासाठी पुरेसा वेळ देणे आणि एकत्र येण्याची अपरिहार्यता त्यांच्या मनावर बिंबवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्याचे नेतृत्व शिवसेनेकडे सोपवणे हा निर्णय प्रत्यक्षात येणे म्हणजे एक स्वप्नच. पण शरद पवारांनी ते सत्यात उतरवून दाखवले. भाजप आपल्या यशाच्या शिखरावर असताना, पक्षाचे सगळे महत्त्वाचे सुभेदार पक्ष सोडून गेले असताना अमोल कोल्हे, अमोल मिटकरी अशा नव्या युवकांकडे प्रचाराची धुरा सोपवताना जिथे आव्हान निर्माण झाले त्या उस्मानाबाद, बीडपासून सातारापर्यंत प्रत्येक ठिकाणी स्वतः आव्हान द्यायचे धाडस पवारांनी केले. आपल्याच एकेकाळच्या अनुयायांना गद्दारीची शिक्षा दिली. पवारांकडे असणारे हे गुण राष्ट्रवादीतले किती नेते शिकले? देशभर मित्र, सर्वत्र शब्द चालणे आणि नव्या आघाडीची प्रेरणा पवारांच्याकडून घेतली असे झारखंडच्या युवा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बोलून दाखवणे आणि त्यांनी भाजपला पिछाडीवर टाकणे हे अद्भुत राजकारण. पण राष्ट्रवादीतील किती नेत्यांनी ते आत्मसात केले? भुजबळ ओबीसीतील माळय़ांचे, आव्हाड आणि धनंजय मुंडे वंजाऱयांचे, नवाब मलिक मुस्लिमांचे अशी नेत्यांची विभागणी होते पण त्यांचा समाज त्यांच्या पूर्णतः पाठीशी आहे हे मात्र सिद्ध होत नाही. धनगर आरक्षणावेळी मधुकर पिचड यांच्या पाठीशी जायचे की धनगर समाजाच्या याचा निर्णय पक्षातील नेत्यांना घेता येत नाही किंवा समन्वयही साधला जात नाही हे राष्ट्रवादीतील उर्वरित नेत्यांचे अपयश आहे. एखाद्या जिह्यात एखादा सुभेदार बाजूला गेला तर तिथले राजकारण फसते हे मुंबई-कोकण, विदर्भ येथे दिसून आले. पक्षात आपली चालावी यासाठी एकमेकाचे पाय ओढले जाऊन नेतृत्वाला मर्यादा पडू लागल्या. आर आर पाटील यांच्यासारखा नेता दिवंगत झाला आणि येणारे प्रत्येक नवे नेतृत्व लोकांच्यामध्ये जाण्याऐवजी सोशल मीडियात रमू लागले. अगदी आजही कोकणातील वादळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी शरद पवारच सर्वात आधी धाव घेतात. मग राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांची जबाबदारी काय असा प्रश्न निर्माण होतो. पवारांनी राजकारणातल्या पिढय़ा घडवल्या. प्रसंगी वाजपेयी, मोदी यांच्याशीही जवळीक ठेवली. त्यातून आपले संस्थात्मक राजकारण जपले. वेळ आली तेव्हा मोदींच्या विरोधात आघाडी निर्माण करण्याचे धाडसही करून दाखवले. आपल्याला गृहीत धरणे पवार खपवून घेत नाहीत आणि त्यावेळी प्रलोभनांना जुमानत नाहीत. ही हिंमत उर्वरित पक्षात निर्माण झाली तरच पंचवीशीतील आव्हाने पेलायला पक्ष सक्षम असेल.
Previous Articleसंगीत संशयकल्लोळ
Next Article एप्रिल-मेमध्ये ईपीएफओकडून 36.02 लाख दावे निकालात
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









