दोघांवरही रत्नागिरीत उपचार सुरू, चिपळूण तालुक्याचा आकडा 67वर
प्रतिनिधी/ चिपळूण
कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतानाचे चित्र पहायला मिळत आहे. 2 जून रोजी मुंबईहून आलेल्या आणि जिल्हा रूग्णालयात उपचार घेतलेल्या तालुक्यातील भिले येथील 70 वर्षिय वृध्देच्या मुलालाही कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोघांवरही रत्नागिरीत उपचार सुरू आहे. सध्या तालुक्यातील बाधितांचा आकडा 67वर पोहचला आहे.
मुंबई-कांदिवली-चारकोप येथून आलेली ही वृध्दा मुंबईतील संजीवनी रूग्णालयात उपचार घेत होती. मात्र तेथील उपचारावरील खर्च परवडत नसल्याने कुटुंबिय 1 जून रोजी रात्री चिपळूणकडे निघाले. येण्यापूर्वीच त्यांनी कापरे प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधला. तेथील आरोग्य पर्यवेक्षक परशुराम निवेंडकर यांनी या कुटुंबियाला गावात येण्यापूर्वी तपासणी नाका तसेच कामथे रूग्णालयात तपासणी करून येण्याचा सल्ला दिला. त्यानुसार कामथे रूग्णालयात सदर वृध्देची तपासणी केल्यानंतर तिला जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच घेण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवाल काही दिवसांपूर्वी पॉझिटीव्ह आला. त्यामुळे तिच्यावर तेथे उपचार सुरू आहेत.
तिच्यासोबत आलेल्या दोन्ही मुलांचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी एकाचा अहवाल मंगळवारी पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे त्याच्यावरही रत्नागिरीतच उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्याच्याव्यतिरिक्त तालुक्यातील कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आलेला नाही. मात्र सोमवारी पोफळी-सरफरेवाडी येथे रूग्ण सापडल्याने ही वाडी आयसोलेट करण्यात आली आहे. येथे अंगणवाडी सेविका, आशा यांच्यामाध्यमातून सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले असून अलोरे-शिरगावाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तालुक्यातील बाधित गावांवर तहसीलदार जयराज सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, गटविकास अधिकारी सरिता पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव लक्ष ठेऊन आहेत.









