मुख्यमंत्र्यांचे सर्व पक्षीय बैठकीत आश्वासन
विदेशांतील गोमंतकीयांची चाचणी मोफत करावी : कामत
सरकारपाशी प्रश्नांची समाधानकारक उत्तरे नाहीत : ढवळीकर
जून, जुलै हे दोन महिने खूप धोक्याचे हे लक्षात घ्या : लुईझिन
प्रतिनिधी / पणजी
विदेशांतून गोव्यात येणाऱया गोमंतकीयांच्या कोरोना चाचणीसाठी सरकारने पैसे आकारू नये, क्वारंटाईन करण्यासाठी पैसे आकारले जाऊ नये अशी मागणी काल सोमवारी झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत विरोधी घटकांनी केली. एसओपी लागू करण्याअगोदर त्यावर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मात्र सरकार ‘हर्ड इम्युनिटी’मध्ये लोकांना ढकलू पाहत आहे. येत्या दोन महिन्यांच्या काळात सरकार 65 वर्षावरील व 10 वर्षाखालील लोकांना अडचणीत आणणार आहे, असा गंभीर आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला.
विरोधी पक्षांच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत कोरोनाच्या समस्येवर सविस्तर चर्चा झाली. मात्र यावेळी सरकारपाशी फार मोठी तयारी नसल्याचे दिसून आल्याचा आरोप विरोधी घटकांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केला.
… तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती
वास्को लॉकडाऊन करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. सरकारने विरोधी सदस्यांना या अगोदर विश्वासात घेऊन निर्णय घेतले असते तर आज ही स्थिती निर्माण झाली नसती असा आरोप विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केला. सरकारने सकाळी सत्ताधारी आमदारांची बैठक घेतली व लागलीच कुणीतरी नवीन एसओपी जाहीर केली. सकाळी एसओपी जाहीर करून संध्याकाळी बैठक बोलावण्यात काय अर्थ आहे, असा प्रश्न कामत यांनी उपस्थित केला. बैठकीत या नवीन एसओपीबाबत विचारले असता त्यावर निर्णय झाला नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
विदेशांतील गोमंतकीयांची चाचणी मोफत करावी
विदेशात असलेल्या गोमंतकीयांना गोव्यात आणल्यानंतर चाचणीसाठी त्यांच्याकडून 2000 रुपये घेऊ नये, ही चाचणी मोफत करावी. त्याचबरोबर क्वारंटाईन करण्यासाठी पैसे घेऊ नये अशी मागणी करण्यात आली. सर्वांनीच संघटीतपणे ही मागणी केल्याचे कामत यांनी सांगितले.
समाजातील दुर्बल घटकांना पॅकेज द्यावे
समाजातील दुर्बल घटक असलेले गाडेवाले, रिक्षावाले, टॅक्सीवाले, पायलट, चणे-खाजे विकणारे यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्याना पॅकेज देण्यात यावे. केंद्र सरकारने 20 लाख कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यातला निधी गोवा सरकारने आणावा व लोकांना पॅकेज द्यावे असेही कामत म्हणाले.
थर्मल गन ऐवजी स्वॅब चाचणी करावी
मांगोरहिल येथील परिस्थिती वाईट आहे. सरकारकडे व्हेंटिलेटर नाही, खाटा भरत आल्या आहेत. मडगावातील कोविड इस्पितळात रूग्ण वाढत आहेत. पण सरकार काही करू शकत नाही. मांगोरहील येथील सर्वाच्या चाचण्या करण्याची गरज नाही असेही कामत यांनी सांगितले. थर्मल गनवर अवलंबून न रहाता स्वॅब चाचणी करावी असेही ते म्हणाले.
जून, जुलै हे दोन महिने धोक्याचे : लुईझिन
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आकडा 300 वर पोचला आहे. ही स्थिती अत्यंत घातक आहे. लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही सरकारची जबाबदारी आहे. जून, जुलै हे दोन महिने धोक्याचे आहेत. कारण या काळात कोरोना गतीने वाढण्याची शक्यता आहे, असे आमदार लुईझिन फालेरोयांनी सांगितले.
सरकारपाशी समाधानकारक उत्तरे नाहीतः ढवळीकर
बैठकीत सरकारला कोरोना क्वारंटाईन सुविधांबाबत विचारले तर सरकारपाशी उत्तर नाही. सरकारची तयारी नसल्याचेच यावेळी दिसून आले. कोरोना रुग्णांनी त्रिशतक पार केले आहे. मांगोरहिल येथील 1600 चाचण्या केल्या आहेत. त्यांचे अहवाल येणे बाकी आहे. तुर्त लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे मगो आमदार सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
इयत्ता 10 वी, 12 वी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाबाबत सरकारने विचार करायला हवा कारण ग्रामीण भागात व खुद्द मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातही ऑनलाईन कनेक्टीविटी चांगली नाही. या मुद्दय़ावर विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, असेही ढवळीकर म्हणाले.
सरकार लोकांना त्रासात टाकणार : सरदेसाई
लोकांनी घाबरून जाऊ नये असे मुख्यमंत्री वारंवार सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात याउलट स्थिती आहे. सरकार लोकांना हर्ड इम्युनिटीमध्ये ढकलू पहात आहे. पुढील दोन महिन्यात स्थिती अत्यंत घातक बनणार आहे. 65 वर्षावरील लोक व 10 वर्षाखालील मुलाना सरकार त्रासात टाकणार आहे, असा गंभीर आरोप गोवा फॉरवर्डचे नेते व आमदार विजय सरदेसाई यांनी केला. लोकांनी सावध रहायची गरज आहे.
धार्मिक स्थळांचे प्रमुख सांगतात ते बरोबर आहे. या सरकारवर विश्वास ठेवता येत नाही. हे काऊबॉय सरकार आहे. सरकारवर आता विश्वास ठेवता येणार नाही. लोकांनी आता गोव्याच्या दैवताकडे मागणी करण्याची गरज आहे.
कर्नाटकात सरकारने रेल्वे गाडय़ा बंद केल्या. मग गोवा सरकार का करू शकत नाही. यावर सरकार उत्तर द्यायला तयार नाही. निषेध करूनच आमच्या बैठकीत आम्ही सहभागी झालो. ही बैठक घ्यायचा सरकारला नैतिक अधिकारच नाही अशी टीकाही सरदेसाई यांनी केली. सकाळी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करायची व संध्याकाळी बैठक घ्यायची म्हणजे मस्करीचा प्रकार आहे. सरकारच्या कारभारात पारदर्शकता नाही. जबाबदारी नाही. या सरकारला आम्ही उघडे पाडले आहे. या अगोदरचे लॉकडऊनही या सरकारने स्वतःहून केले नाही. जनता कर्फ्यू व केंद्र सरकारने लॉकडाऊन जारी केल्यामुळे गोव्यात लॉकडाऊन झाले. हे सरकार जि. पं. निवडणूक घेण्याच्या तयारीत होते, असा आरोपही त्यांनी केला.
अगोदर मुख्यमंत्री सांगत होते घाबरायचे कारण नाही. आता राज्याचे मुख्यसचिव तीच भाषा बोलत आहेत. आज जगभरात कोरोनामुळे घबराट पसरली आहे. आणि ते आम्हाला सांगातात घाबरू नका. लोकांनाही जाऊन सांगा घाबरू नका असा सल्ला मुख्य सचिव देत आहेत. असला वेडेपणा आम्हाला सांगू नका हे आम्ही सांगितले आहे. 70 टक्के लोकाना यामध्ये ढकलण्याचा सरकार प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप सरदेसाई यांनी यावेळी केला. डॉक्टर सांगतात 7 दिवसात रुग्ण बरे होतात. आज देशभरात लोक मरत आहेत. धंदे गेले, सर्व वाट लागून गेली. तरीही सरकार सांगते घाबरू नका आज प्रशासनही हीच भाषा बोलत आहे, असेही ते म्हणाले.









