नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सरसेनापती बिपीन रावत यांच्यासह तिन्ही सुरक्षा दलांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली. सुमारे तासभर चाललेल्या बैठकीत दोन्ही देशातील सैन्य अधिकाऱयांमध्ये झालेल्या चर्चेचा आढावा घेण्यात आला. तसेच रावत यांनी भविष्यातील योजनांची माहिती तिन्ही दलांच्या प्रमुखांना दिली.
सुरक्षा आणि गोपनीयतेच्या पार्श्वभूमीवर बैठकीतील चर्चेविषयीही सविस्तर वाच्यता करण्यात आलेली नाही. तरीही पाकिस्तान आणि चीन या दोन्ही शेजारी देशांसमवेत काश्मीर आणि लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या काळातच ही बैठक झाल्याने त्यावरही यात चर्चा झाली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. चर्चेचा आढावा आणि सैन्याची मोठय़ा लढय़ासाठी असणारी तयारी, त्याचे भविष्यातील नियोजन यासाठी ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीत देशासमोर असणाऱया समस्यांबाबतच्या नियोजनाचा आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.









