पूर्व व पश्चिम किनारपट्टीवर पाऊस होण्याची शक्यता
पुणे / प्रतिनिधी
पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात येत्या 24 तासांत कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होणार असून, त्याचा प्रभाव वाढणार आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम-उत्तर पश्चिमेकडे सरकणार असून, त्याच्या प्रभावामुळे कर्नाटक, महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी वर्तविला आहे.
येत्या 24 तासांत पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्र निर्माण होणार आहे. त्याच्या पुढील 24 तासांत त्याची तीव्रता आणखी वाढेल. तसेच हे क्षेत्र पश्चिम-उत्तर पश्चिमेच्या दिशेने सरकणार असल्याने पूर्व किनारपट्टीसह पश्चिम किनारपट्टीलाही ते झोडपून काढेल. 10 ते 12 जूनच्या दरम्यान ओरिसा, उत्तर आंध्र किनारपट्टी, तेलंगणा, कर्नाटक किनारपट्टी, उत्तर कोकण, केरळ, महे या भागात मुसळधार, तर उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, छत्तीसगड, दक्षिण मध्य प्रदेशच्या भागात 11 व 12 जूनला जोरदार पावसाची शक्यता आहे.
मान्सूनला चालना
दरम्यान, सोमवारी मान्सूनची रेषा कायम होती. मान्सून कारवार, शिमोगा, चित्तूर, चेन्नईपर्यंत पोहोचला आहे. पुढील दोन दिवसांत तो कोकण व गोव्यात दाखल होईल. तसेच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला चालना मिळणार असून, त्यामुळे पूर्वेकडचा भाग तो लवकर व्यापण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.









