अवघ्या पंधरा दिवसांतच रस्ता खचला : नागरिकांकडून तीव्र नाराजी
प्रतिनिधी / कुडाळ:
मुंबई-गोवा महामार्गाचे कुडाळमधील काम घाईगडबडीत उरकून घेण्याच्या नादात ठेकेदाराने निकृष्ट केल्याचे पहिल्या पावसातच उघड झाले आहे. कुडाळ येथील जयराज राणे यांच्या घरासमोरील सुमारे पन्नास मीटर लांबीच्या डांबरीकरण केलेल्या पक्क्मया मार्गालाच तडे गेले असून महामार्ग खचू लागला आहे. त्यामुळे शहरवासीयांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दिलीप बिल्डकॉन कंपनीने मुंबई-गोवा महामार्गाचे काम कुडाळ शहरात करताना घिसाडघाईने केले होते. अजूनही कामात सुधारणा झालेली नाही. त्यावेळीही कंपनीच्या कामाबाबत नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. मात्र, लोकप्रतिनिधींनी नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष केले. कुडाळमध्ये अजून म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. तसेच जेथे रस्ता खचला तो भाग दलदलीचाही नाही. सध्या महामार्गावर फारशी वाहतूकही नाही. रस्ता केल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच तो खचला आहे. महामार्गावरील डांबरीकरणाला मोठय़ा म्हणजे एक इंच रुंदीच्या भेगा पडल्या आहेत.
सध्या शहरात सुरू असलेले काम दर्जाहीन असून पावसाळय़ात महामार्गही बंद पडण्याची भीती आहे. पाणी साचू नये. तसेच अडथळे निर्माण होऊ नये, याची दक्षता ठेकेदार घेताना दिसत नाही. पावसाळा संपल्यानंतर शहरातील महामार्गाचे बहुतांश काम ठेकेदाराला पुन्हा करावे लागणार आहे, अशी स्थिती आहे.









