कडेगाव/ प्रतिनिधी
शिवाजीनगर ता.कडेगाव येथील बारा वर्षीय अल्पवयीन मुलीस जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी यशवंत मारुती आयवळे आणि निवास मारुती आयवळे (दोघे रा. शिवाजीनगर) यांच्या विरोधात कडेगाव पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कडेगाव पोलिस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या घटनेने शिवाजीनगर परिसरात खळबळ उडाली असून गावातील नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित अल्पवयीन बारा वर्षीय मुलगी व त्यांचे कुटुंब शिवाजीनगर येथे वास्तव्यास आहे. कुटुंबातील लोक शिवाजीनगर येथेच शेती व्यवसाय करतात. दरम्यान १६ मे २०२० पासून संशयित आरोपी यशवंत मारुती आयवळे याने खावू आणि पैशाचे अमिष दाखवून येथील संजय आयवळे यांच्या ऊसाच्या शेतात वेळोवेळी बलात्कार केला. तर संशयित निवास आयवळे याने त्याच्याच शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच याबाबत कोणास काही सांगितले तर तुझ्या घरच्यांना जीवे मारीन अशी धमकी पीडित मुलीस दिली. या घटनेची माहिती पीडित मुलीने तिच्या घरच्यांना सांगितली. त्यानंतर मुलीच्या आईने कडेगाव पोलिस ठाण्यात संशयित आरोपींच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक साळुंखे करीत आहेत.