पालकमंत्र्यांची भेट : काम पूर्णत्वासाठी अधिकाऱयांना सक्त सूचना : कोविड रुग्णालयासाठी प्रयत्न
प्रतिनिधी / कुडाळ:
संपूर्ण कामाच्या पूर्ततेच्या गेले काही महिने प्रतीक्षेत असलेल्या कुडाळ येथील महिला-बाल रुग्णालयाच्या इमारतीत कोविड रुग्णालय सुरू व्हावे, यासाठी पालकमंत्री उदय सामंत व आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी रुग्णालय इमारतीला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
गेले काही महिने रेंगाळलेले विद्युतीकरणाचे काम तात्काळ पूर्ण करून घ्या, अशा सक्त सूचना सामंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता (विद्युत) श्री. बंड यांना दिल्या. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत याच ठिकाणी तुमचे कार्यालय सुरू करा, असे सांगितले. अधिकाऱयांच्या कार्यपद्धतीबाबत त्यांनी व नाईक यांनी नाराजी व्यक्त केली. सध्या सिंधुदुर्गात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. वाढलेल्या या रुग्णांना ठेवायचे कुठे?, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे, याची गंभीर दखल पालकमंत्री सामंत यांनी घेत कुडाळ येथील महिला-बाल रुग्णालयात कोविड हॉस्पिटल व्हावे, यासाठी शासनाकडून खास परवानगी घेतली. त्यानंतर मंगळवारी रुग्णालय इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली.
आमदार नाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जे. डी. कुलकर्णी, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, कार्यकारी अभियंता एस. एस. शेवाळ, उपअभियंता एस. पी. हिवाळे, शाखा अभियंता व्ही. व्ही. जोशी, शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, नगरसेवक सचिन काळप, संतोष शिरसाट, अभय शिरसाट आदी उपस्थित होते.
उपअभियंत्यांना सुनावले
या इमारतीच्या मंजूर असलेल्या विद्युतीकरण कामाची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता (विद्युत) बंड यांच्याकडून घेतली. पण, मंजूर कामाबाबत काहीशी चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न करणारे बंड यांना सामंत यांनी सुनावत पंधरा दिवसांत काम पूर्ण करून घ्या. तत्पूर्वी कामाच्या निविदेबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण करा. आवश्यकता वाटल्यास जिल्हाधिकाऱयांना भेटा. विद्युतीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत याच ठिकाणी तुमचे कार्यालय तसेच बांधकाम विभागाचे कार्यालय तात्काळ सुरू करा, असे सांगितले.
काम वेळेत पूर्णत्वासाठी आदेश
इमारतीच्या विद्युतीकरण कामात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, जिल्हाधिकारी यांच्याशीही सामंत यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यानंतर उपस्थित असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जे. डी. कुलकर्णी यांनाही सामंत यांनी काही सूचना दिल्या. त्यानंतर येथील विद्युतीकरणाच्या कामाला काहीच अडचण येणार नाही. खरं तर यापूर्वीच हे काम होणे अपेक्षित होते. पण ते झाले नाही, असे कुलकर्णी यांनी सांगितले. पालकमंत्र्यांसमोर स्पष्टीकरण देत असलेल्या बंड यांना काम वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करा, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
आमदार नाईक यांनीही बंड यांच्या कार्यपद्धतीबाबत पालकमंत्र्यांसमोर संताप व्यक्त केला. इमारतीच्या विद्युतीकरणाचे काम वेळेत व्हावे, यासाठी आपण स्वतः दोन-तीनवेळा बंड यांच्याशी चर्चा केली. या कामासाठी बजेटमधून पाच कोटीचा निधी मंजूर असून पहिल्या टप्प्यात 1 कोटी 69 लाख प्राप्त झाले आहेत. ते काम वेळेत व्हावे, यासाठी आपण स्वतः मुख्य अभियत्यांशी चर्चा केली, तरीही या अधिकाऱयांनी हे काम केले नाही, असे सांगत या अधिकाऱयाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली.
..तर तुम्ही काय कराल?
दरम्यान, कुलकर्णी यांनी बंड यांना तुमचा कोणी रुग्ण आला व बेड मिळाला नाही, तर तुम्ही काय कराल?, तुम्हाला काय वाटेल, याचा विचार करा. जिल्हय़ात रुग्ण वाढत आहेत. लोकांना सोय न मिळाल्यास मोठा पेच निर्माण होण्याची भीती व्यक्त केली.









