भोस्ते घाटातील दुर्घटना, 40 प्रवासी बचावले
प्रतिनिधी/ खेड
रत्नागिरी येथून मजुरांना घेऊन नेपाळला जाणारी खासगी आरामबस उलटल्याची घटना रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील भोस्ते घाटात घडली. अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. अपघातानंतर बसचालकाने घटनास्थळावरून पलायन केले.
कोरोनाच्या भीतीने मजूर गावी परतत आहेत. जिल्हय़ात विविधठिकाणी काम करणाऱया नेपाळी मजुरांनी गावी जाण्यासाठी खासगी आरामबस निश्चित केली. प्रत्येक मजुरांकडून 7 हजार रूपयांची आकारणी करत जोतीर्लिंग ट्रव्हल्स कंपनीची खासगी बस रविवारी सायंकाळी 6 वाजता रत्नागिरीतून नेपाळच्या दिशेने निघाली होती. बसमध्ये 40 प्रवाशांसह लहान मुलांचा समावेश होता. बस भोस्ते घाटात आली असता अवघड वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या दुभाजकावर आदळून उलटली.
अपघाताचे वृत्त कळताच पोलीस यंत्रणेसह मदत ग्रुप व रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहचून मदतकार्य हाती घेतले. बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या सर्व प्रवाशांची मदत ग्रुप व रेस्क्यू पथकाने जेवणाची व्यवस्था केली. पोलीस यंत्रणेनेही सर्व प्रवाशांची माहिती घेतली. बसमध्ये 30 आसनांची क्षमता असतानाही 40जणांची वाहतूक करण्यास परवानगी कशी दिली? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अपघातस्थळावरून पलायन केलेल्या बसचालकाचा शोध सुरू असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोस्ते घाटातील वळण ठरतेय धोकादायक
खासगी आरामबसला भोस्ते घाटातील अवघड वळणावर झालेल्या अपघाताने महामार्ग चौपदरीकरणातील हे वळण धोकादायक ठरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. गत महिन्यात याच वळणावर 6 अपघात घडले आहेत. महामार्ग चौपदरीकरणादरम्यान तयार करण्यात आलेले हे वळण धोकादायक असल्यामुळेच सातत्याने त्याचठिकाणी अपघात होत आहेत. यामुळे राष्ट्रीय महामार्ग खात्याने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.









