ऑनलाईन टीम / लोणावळा :
मावळ तालुक्यातील सक्रिय 16 रुग्णांपैकी पाच रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
मागील 23 दिवसांमध्ये मावळात शहरी भागात 6 व ग्रामीण भागात 10 अशा एकूण 16 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यापैकी पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आता तालुक्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 11 झाली आहे. मावळातील कोरोना रुग्णांची संख्या घटत चालल्याने तालुक्यात दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.
तळेगावात 7 मे रोजी मावळातील पहिला कोरोना रूग्ण सापडला. त्यापाठोपाठ 11 मे रोजी माळवाडी येथे दुसरा रुग्ण आढळला. ते दोन्ही रूग्ण कोरोना मुक्त झाले होते. त्यानंतर 19 मे अहिरवडे, 21 मे चांदखेड 24 मे घोणशेत याही तिनही पाॅझिटिव्ह झालेल्या रूग्णांनी कोरोनावर मात करून कोरोना मुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण पाच रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मागील दोन दिवसात मावळात रुग्णांची संख्या वाढलेली नाही तर लागण झालेले रुग्ण बरे होत असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे.








