पुणे बेंगळूर महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार ः तासगांव, विटा शहरांनाही होणार फायदा
प्रतिनिधी / सांगली
पुणे बेंगळूर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा वाढता ताण कमी करण्याच्या दृष्टीने पुणे ते संकेश्वर या नव्या पर्यायी महामार्गाची मागणी पुढे येत असून हडपसरपासून सुरू होणाऱया या महामार्गामुळे पुणे, सातारा, सांगली व बेळगांव जिल्हयातील अनेक छोटया मोठया शहरांना व गावांना फायदा होणार आहे. सांगलीबरोबर जिल्हयातील मिरज, तासगांव, विटा ही शहरेही नव्या पर्यायी महामार्गावर येणार असल्याने जिल्हयाच्या विकासाला विशेषतः कायमस्वरूपी आणि पाचवीला पुजलेल्या दुष्काळीपट्टयाच्या विकासाचे दार खुले होणार आहे. या महामार्गासाठी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुराव्याची आवश्यकता आहे.
देशातील सर्वात व्यस्त आणि प्रचंड वाहतुकीचे जे महामार्ग आहेत. त्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार ओळख असलेला पुणे ते बेंगळूर या महामार्गाचा क्रमांक लागतो. दररोज हजारो वाहनांची ये जा असणार्या या महामार्गावरून बेंगळूर, हुबळीपासून बेळगांव, कोल्हापूर, सातारा ते पुणे या जिल्हयातून थेट तर सांगली जिल्हयातील कणेगांवपासून कासेगांवपर्यंत काही कि. मी. पर्यंत हा महामार्ग गेलेला आहे. सांगली-इस्लामपूर मार्गावर पेठनाक्याजवळ हा महामार्ग जोडला गेलेला आहे. महामार्गाचा महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या विकासाला आणि दळणवळणाच्या दृष्टीने चाळीस ते पन्नास वर्षात मोठाच फायदा झाला.
सुरूवातीला अगदी दुपदरी असणारा महामार्ग कालांतराने चारपदरी तर सध्या सातारा ते कागलपर्यंत सहापदरी करण्यात येत आहे. तरीही वाहनांची संख्या वाढतच आहे. अनेक ठिकाणी टोलनाके असूनही सोयीचा व बेळगांव, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हयांना विशेषतः पुणे आणि पुढे मुंबईला जोडणारा एकमेव महामार्ग म्हणून पुणे ते बेंगळूर या महामार्गाचे महत्व निश्चितपणे अधोरेखीत होते.
गेल्या पन्नास एक वर्षात सांगली जिल्हयाला पुण्या मुंबईशी जोडणार्या पुणे ते बेंगळूर या एकमेव महामार्गावर अवलंबून रहावे लागले आहे. गेल्यावर्षी आलेल्या महापूरावेळी कोल्हापूरच्या शिरोली एमआयडीसीजवळ हा महामार्ग आठ दिवस पाण्याखाली होता. त्यामुळे महामार्गावर साताऱयापासून कराड कोल्हापूरपर्यंत ठिकठिकाणी हजारो ट्रक अडकून होते. अखेर लष्कराला पाचारण करून काही दिवसानंतर वाहतूक सुरू करावी लागली होती.
दक्षिण महाराष्ट्रामध्ये नागपूर-रत्नागिरीसह काही नव्या राष्ट्रीय महामार्गाची कामे वेगाने सुरू असली तरी सांगली जिल्हयाला विशेषतः पुण्या मुंबईशी जोडण्यासाठी पर्यायी महामार्गाची गरज असून यातूनच पुणे ते संकेश्वर या नव्या राष्ट्रीय महामार्गाची मागणी पुढे आली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांना रस्ते मार्गाने जोडण्यासाठी सध्याच्या पुणे ते बेंगळूर या महामार्गाशिवाय पुणे ते संकेश्वर हा आणखी एक पर्यायी महामार्ग उपलब्ध होणार आहे. यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुराव्याची आवश्यकता आहे.
पुणे-संकेश्वर या पर्यायी राष्ट्रीय महामार्गासाठी महाराष्ट्र चेंबर्सचे माजी अध्यक्ष व सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील हे गेल्या पंचवीस वर्षाहून अधिक काळ पाठपुरावा करत आहेत. हा नवा पर्यायी महामार्ग अस्तित्वात आल्यास पुणे ते बेंगळूर या महामार्गावरील वाहतूकीवरील मोठा ताण कमी होणार आहे. शिवाय पुणे, सातारा, सांगली आणि बेळगांव या चार जिल्हय़ासाठी विकासाचे नवे दार खुले होणार आहे.
असा असेल पर्यायी महामार्ग
पुणे ते संपेश्वर हा पर्यायी महामार्ग पुण्यातील हडपसरपासून सुरू होवून जेजूरी, फलटण, विटा, तासगांव, मिरज, चिक्कोडी या मार्गे संकेश्वरला जोडला जाईल. यामुळे तासगांव विटयासारखी छोटी मोठी गावे महामार्गावर येतील. सांगली मिरजेतील वाहनांना बेळगांवला जाण्यासाठी जवळचा महामार्ग उपलब्ध होईल. दुष्काळी भागातून हा महामार्ग जाणार असल्याने या भागातील अनेक छोटे मोठे उद्योग, साखर कारखाने, एमआयडीसी, सुतगिरण्या यांना मालवाहतुकीसाठी या पर्यायी महामार्गाचा चांगला फायदा होणार आहे. पुण्याच्या हडपसर भागातही प्रचंड नागरी वस्ती वाढत आहे. तिकडून सातारा, कोल्हापूर बेळगांवच्या दिशेला येणाऱया वाहनचालकांना पर्यायी महामार्ग उपलब्ध होईल. तासगाव भागातील द्राक्षे, बेदाणे आदींसह शेतीमाल पाठविण्यासाठी या महामार्गाचा चांगला उपयोग होणार आहे. गेल्यावर्षीच्या महापूरावेळी सांगलीतील मदतकार्यासाठी लष्कराची वाहने याच पर्यायी मार्गाने सांगली शहरात आली होती हे विशेष.








