
दक्षिण कोरियात दिवसभरात कोरोना संसर्गाचे 79 नवे रुग्ण मिळाले आहेत. 5 एप्रिलनंतर पहिल्यांदाच एवढय़ा अधिक संख्येत रुग्ण सापडले आहेत. दक्षिण कोरियाने कोरोनाच्या महामारीवर नियंत्रण मिळविल्याचे मानले जात होते. परंतु तेथील निर्बंध शिथिल करण्यात आल्यावर रुग्णसंख्या वाढू लागली आहे. देशातील अधिकाऱयांना आता संसर्गाच्या दुसऱया लाटेची भीती सतावू लागली आहे. दक्षिण कोरियात आता शाळा देखील सुरू करण्यात आल्या आहेत.
आखातात 2 लाख बाधित

आखाती देशांमध्ये कोरोना संसर्गाचा आकडा 2 लाखांपेक्षा अधिक झाला आहे. सौदी अरेबियात सर्वाधिक 78 हजार 541 बाधित आढळून आले असून 425 जणांचा मृत्यू झाला आहे. सौदी अरेबियात सरकारने निर्बंध शिथिल करण्यास प्रारंभ केला आहे. आखाती देशांमध्ये कुवेत, कतार, बहारीन, ओमान, संयुक्त अरब अमिरात यासारख्या देशांचा समावेश आहे. आखातात कोरोनाचा मृत्यूदर मात्र अन्य देशांच्या तुलनेत कमी असून वैद्यकीय सुविधांचा दर्जाही उत्तम आहे.
रशियाला 150 व्हेंटिलेटर्स

अमेरिका रशियाला शनिवारी आणखीन 150 व्हेंटिलेटर्स पाठविणार असल्याची माहिती वाययर मेडिकल कंपनीचे प्रतिनिधी पॅट्रिक ओकॉनर यांनी दिली आहे. 150 आणि एलटीव्ही 2200 व्हेंटिलेटर्स शनिवारी पाठविले जाणार आहेत. मागील आठवडय़ात अमेरिकेने 50 व्हेंटिलेटर्स पाठविले होते. अमेरिका रशियाला एकूण 50 लाख 60 हजार डॉलर्सची उपकरणे पाठविणार आहे. रशियातील कोरोना संकट आता वाढत चालल्याने वैद्यकीय यंत्रणेवरील ताण वाढला आहे.
ब्राझील : 4 लाख बाधित

ब्राझीलमध्ये मागील 24 तासांत 1,086 जण कोरोना संसर्गामुळे दगावले आहेत. तर देशातील एकूण बळींचा आकडा 25,697 वर पोहोचला आहे. ब्राझीलमधील बाधितांचे एकूण प्रमाण 4,14,661 झाले आहे. ब्राझील अमेरिकेनंतर दुसऱया क्रमांकाचा कोरोनाने पीडित देश ठरला आहे. ब्राझीलमध्ये टाळेबंदी लागू करण्यास केंद्रीय प्रशासनाने टाळाटाळ केल्याने संकट वाढल्याचे मानले जात आहे. अमेझॉनच्या जंगलांमध्येही संसर्गाने शिरकाव केल्याने चिंता व्यक्त होत आहे.









