सुनिल राजगोळकर / बेळगाव
केंद्र सरकारच्या पशुसंजीवनी योजनेंतर्गत जनावरांच्या कानांवर बारा अंकी नंबरचा टॅग (नोंदणी क्रमांक) लावण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून 30 एप्रिल 2020 पर्यंत जिल्हय़ात 5,24,339 जनावरांना टॅगिंग करण्यात आले आहे. पशुसंजीवनी योजना सुरू होऊन तीन वर्षे उलटली तरी अद्याप 8,89785 जनावरांच्या टॅगिंगचे काम शिल्लक आहे. उर्वरित जनावरांना टॅगिंग करण्याचे काम जोरात असून घरा-sघरी जाऊन मोफत सुविधा पुरविली जात असून सर्व जनावरांना टॅग लावून घेणे बंधनकारक आहे.
बेळगाव तालुक्मयात 1,78,075 इतकी जनावरांची संख्या असून त्यापैकी 68,000 हजार जनावरांच्या कानांना टॅग लावण्यात आले असून अद्याप 77,894 जनावरे शिल्लक आहेत. तीन महिन्यांवरील सर्वच जनावरांना टॅर्गिंग करण्यात येत आहे. त्यामध्ये बैल, म्हैस, गाय, रेडा व लहान जनावरांचा समावेश आहे.
संपूर्ण पशुधनाची ओळख निर्माण करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात जनावरांच्यादृष्टीने खाते चांगली क्यवस्था करत आहे. संपूर्ण देशात ही अभिनव योजना राबविण्यासाठी खाते प्रयत्नशील आहे. टॅगिंग करण्याबरोबर जनावरांची संपूर्ण माहिती ऑनलाईन पध्दतीने संग्रहीत केली जात आहे. त्यामुळे टॅग केलेल्या जनावरांची संपूर्ण माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. जनावरांची एकूण संख्या किती, त्यापैकी दुभती जनावरे किती, कोणाच्या मालकीचे आहे, त्यांची दूध उत्पादन क्षमता किती, कुठल्या भागातले आहे, कोणत्या जातीचे आहे, यासंबंधी सर्व माहिती एकत्रित मिळण्याबरोबर जनावरांची ओळख पटविण्यास हा टॅग महत्त्वाचा ठरणार आहे.
सुरूवातीच्या काळात केवळ दुभत्या जनावरांची नोंदणी करण्यात आली होती. मात्र आता सर्वच जनावरांना टॅगिंग केले जात आहे. शासनाच्या सेवा इतर सुविधा जनावरांपर्यंत पोहोचविण्यासाठी टॅग महत्त्वाचा ठरणार आहे. या क्रमांकामुळे एकूण जनावरांची संख्या समजण्याबरोबर एखाद्यावेळी जनावर चोरी गेल्यास जनावरांचा मालक समजण्यास मदत होणार आहे. या टॅगिंगबरोबर जनावरांचे वय, उंची, आहार, जनावारांच्या मालकाचे आधारकार्ड, मोबाईल क्रमांक ही सर्व माहिती ‘इनाफ’ या सॉफ्टवेअरमध्ये भरून आधारकार्डच्या धर्तीवर युनिक आयडी बनवली जात आहे. मोबाईल ऍपवर संबंधित जनावरांचा टॅग क्रमांक टाकल्यास सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.
पशुपालक जिल्हय़ाच्या विविध बाजारासह परराज्यांतील महाराष्ट्र गुजरात, हरियाणा येथून जनावरे विकत आणतात. अशावेळी त्यांची ओळख पटविण्यासाठी हा टॅग महत्त्वाचा ठरतो. आजचे युग हे संगणक युग आहे. या युगात सर्व जनावरांची माहिती ऑनलाईन पद्धतीने संकलित करून ठेवली जात आहे. त्यामुळे जनावरांची माहिती कोठूनही आणि केव्हाही उपलब्ध होऊ शकते.
सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांतून जनावरांना वैद्यकीय सुविधा पुरविण्याबरोबर मोफत टॅगिंगचे करण्यात येत असून टॅगमुळे जनावरांची खरेदी-विक्री, प्रजननक्षमता, रोगप्रतिबंधक लसी, लागणारा औषध पुरवठा, कृत्रिम रेतन या बाबींची नोंद ठेवता येणार आहे. त्यामुळे आता दुभत्या जनावरांबेराबर बैल, म्हशी, शेळी-मेंढीनादेखील टॅग लावणे बंधनकारक आहे.









