पेपर टारगेटवर करते सराव, तिच्या मागणीनुसार क्रीडा मंत्रालय इलेक्ट्रीक टारगेट देण्यास तयार
संग्राम काटकर / कोल्हापूर
कोरोनामुळे पुण्यातील बालेवाडी सोडून कोल्हापूरात परतलेल्या ऑलिंपिकवीर नेमबाज राही सरनोबतने सध्या पद्माळा येथील विभागीय क्रीडा संकुलातील शुटींग रेंजवर लक्ष्य साधन्याच्या सरावाला गेल्या शुक्रवारपासून सुरुवात केली आहे. संकुलात पेपर टारगेटवर ती नेमबाजीचे लक्ष्य साधत आहे. वैशिष्ठय़ म्हणजे 25 मीटर पाईंट टूटू स्पोर्टस् पिस्टलसाठीचे टागरेटच संकुलात नसल्याने राहीने पेपर टारगेट स्वखर्चातून तयार करुन घेतले आहे. तीने केलेल्या मागणीनुसार शुटींग रेंजवर इलेक्ट्रीक टारगेटची व्यवस्था केली जाईल, असे संकेत क्रीडा मंत्रालयाने दिले आहेत. पण तेव्हा मिळेल याची शाश्वती नसल्याने आणि सरावात खंड पडू नये, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावरील रॅकींग बिघडू नये म्हणून राहीने स्वतःला सरावात झोकून दिले आहे.
पुढील वर्षी टोकीयो होणाऱया ऑलिंपिकमध्येसाठी राही पात्र ठरली आहे. पदकाच्या अपेक्षेने ती बालेवाडीत कसून सरावही करत होती. गेल्या मार्च महिन्यात कोरोनाचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आणि तिचे सरावाचे नियोजनच बिघडले. राही सराव शिबिर व संघ निवड चाचणीसाठी दिल्लीला गेली होती. याच काळात कोरोनाचा पुण्यात शिरकाव होऊन बाधितांची संख्याही वाढत गेली होती. त्यामुळे लोकांना कोरोटांईन करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने बालेवाडीलाच ताब्यात घेतले. त्यामुळे नॅशनल रायफल असोसिएशनने राहीला कोल्हापूरात जाऊन विभागीय क्रीडा संकुलातील शुटींग रेंजवर सराव करण्याची सुचना दिली होती. त्यानुसार राही 17 मार्चला कोल्हापुरातील आपल्या घरी दाखल झाली. मात्र शुटींग रेंजवर 25 मीटर पाईंट टूटू स्पोर्टस् पिस्टलसाठीच्या टारगेटचीच सोय नसल्याने राहीने घरीच थांबून योगासह व्यायाम करावा सुरुवात केली.
आणखी काही दिवस शुटींग रेंजवर सरावच झाला नाही तर मात्र त्याचा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील आपल्या रँकींगवर परिणाम होण्याची भिती राहीने व्यक्त केली आहे. तसेच ऑलिंपिकसह अन्य राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित ठेवल्या असल्याने सरावाकडे सहाजिकच दुर्लक्ष होऊ शकते. मात्र असे घडू नये म्हणून राहीने अलीकडेच विभागीय क्रीडा संकुलात आपण सराव करण्यास तयार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांना सांगितले होते. त्यासाठी लागणारे पेपर टारगेटही स्वतःच बनवून घेण्याची आपली तयार असल्याचेही राहीने त्यांना सांगितले आहे. त्यांनीही तिच्या सरावात खंड पडू नये म्हणून सरावासाठी लागणाऱया अन्य सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली आहे. त्यानुसार गेल्या शुक्रवारपासून राहीने क्रीडा संकुलातील शुटींग रेंजवर सरावाला सुरुवात केली आहे.
तेजस्विनीचा सध्या घरीच सराव…
टोकीयो ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली कोल्हापूरची गोल्डनगर्ल तेजस्विनी सावंत ही प्रशिक्षकांच्या अनुमतीनुसार 19 मार्चला कोल्हापुरातील आपल्या घरी परतली आहे. प्रशिक्षकांच्या सुचनेनुसार तीने पुढील 14 दिवस स्वतःला कोरोंटाईन करुन घेतले होते. त्यानंतर तीने आपल्या सराव खंड पडू नये म्हणून घरामध्येच बनविलेल्या 10 मीटर शुटींग रेंजच्या टारगेटवर 50 मीटर थ्रीपोझिशन रायफल सरावाला सुरुवात केली. प्रशिक्षकांशी मोबाईलवरुन सातत्याने संपर्क साधत सरावाच्या टिप्स घेत सध्या ती लक्ष्य साधत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर प्रशिक्षकांच्या अनुमतीनंतरच सरावाला कुठे सुरुवात करायची हे ठरविले जाईल, असे तेजस्विनीने सांगितले.









