वार्ताहर/गोकुळ शिरगाव
कोल्हापूर विमानतळावर विमानसेवा गेल्या तीन दिवसापासून सुरळीत चालू आहे. आज विमानतळावर कोल्हापूर हैदराबाद या विमानातून नऊ प्रवासी हैदराबादला गेले तर तीन प्रवासी कोल्हापूरमध्ये आले. नेहमीप्रमाणेच या सर्वांची टेस्ट करून शासनाच्या नियमानुसार या प्रवाशांना सोडण्यात आले.
विमानसेवा सुरू झाल्यानंतर आज, बुधवारी दुपारी बारा वाजता मान्सून पूर्वची तयारी इंडियन कोस्ट गार्ड यांच्या प्रतिनिधींनी बैठक घेऊन विमानतळाची पाहणी केली. गेल्या वर्षी कोल्हापूर मध्ये आलेल्या महापुराच्या काळात ( एन.डी.आर.एफ.) इंडियन कोस्ट गार्ड यांनी केलेली मदत कोल्हापूरकर विसरू शकणार नाहीत. या वर्षी पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झालेस आपत्ती व्यवस्थापनासाठी कोल्हापूर विमानतळ पाहणीसाठी इंडियन कोस्ट गार्ड टीमचे अशोक यादव (कमांडर) अमित कोरगावकर यांनी विमानतळ पाहणी केली.
तर पूर परिस्थिती निर्माण झालेस रत्नागिरी मधून कोल्हापूरला एक तासात तर गोवा येथून दोन तासात कोल्हापुरात इंडियन कोस्ट गार्ड ची टीम मदतकार्यासाठी पोहोचणार असल्याचे विमान प्राधिकरणाचे संचालक कमल कुमार कटारिया यांनी या बैठकीच्या वेळी सांगितले. विमानतळावरील सोयीसुविधा पाहून कमांडर अमित कोरगावकर ,अशोक यादव विमानतळावरील कामाबाबत समाधान व्यक्त केले.
क्वारंटाईन होण्याच्या भीतीने विमानाने प्रवास करण्याचा लोकांचा कल थोडा कमी असल्याची शक्यता वाटत असल्याचा निर्वाळा यावेळी कमल कटारिया यांनी दिला. विमानसेवेसाठी तिकीट बुकिंग होत आहे .हळूहळू संख्या वाढेल अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली. क्वारंटाईन होण्याच्या कारणाने कदाचित प्रवासी कमी येत असावेत असे त्यांनी आपले मत यावेळी व्यक्त केले. .पण विमान चालू झाल्यापासून बुकिंग साठी विचारणा होत असून प्रवासी संख्या वाढत आहे . ही संख्या थोड्याच दिवसात पूर्वपदावर येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.








