श्रीकृष्ण जांबवंताच्या गुहेत शिरला तो बरेच दिवस परतला नाही, त्यामुळे गुहेबाहेर थांबलेल्या सर्व द्वारकावासी लोकांची मने उद्विग्न झाली. कृष्णाची उपेक्षा करून परत फिरणेही त्यांना योग्य वाटेना. कसेबसे धैर्य एकवटून ते कृष्णाची वाट पाहू लागले. दाही दिशांना कृष्ण कोठे दिसतो का ते पाहू लागले. काही उपाय चालेना. ते आपापसात म्हणू लागले-सत्राजिताची ही दुर्बुद्धी आम्हाला नडली. या कृष्णाचा प्राण या विवरात बहुधा गेला असावा. त्याचे प्रेत आत कुठेतरी पडले असेल. असे नाना तर्क ते करू लागले. तहान भुकेचे दु:ख सहन करत ते बारा दिवस तेथे राहिले. मग कृष्ण परतण्याची आशा सोडून ते द्वारकेला परतले. द्वारकेपाशी येताच त्यांनी आरोळी ठोकली-यदुनायक श्रीकृष्ण एका विवरात नाहीसे झाले हो! ती आरोळी ऐकून द्वारकेतील लोकांनी मोठाच शोक केला.
ऐकोनि देवकी पडली धरणी । हृदय पिटी पिटी आक्रन्दोनी ।
कोठें उदेला स्यमंतकमणि । अघटित करणी दैवाची ।
सत्राजित हा काळरूपी । याचया मिथ्याभिलाषजल्पीं।
कृष्ण निष्कलंक प्रतापे । परिहारकल्पीं निमाला ।
विवरामाजी महाव्याळ । तिहीं डंखिला गोपाळ ।
किंवा राक्ष सिंह शार्दूळ । ऋक्ष कराळ तिहीं वधिला ।
कृष्ण माझा अतिसकुमार । कृष्ण माझा अतिसुन्दर ।
कृष्ण माझा परम चतुर । कां पां विवर प्रवेशला ।
श्रीकृष्णाचें आठवी गुण । ठाणमाण रूपलावण्य ।
शौर्य प्रताप संभाषण । मुखें स्मरोन विलपतसे ।
ललाट पिटोनि दीर्घ रडे । रोहिणीप्रमुखा चहूंकडे ।
हा हा करोनि ओरडे । बोधूनि तोंडें सांवरिती ।
म्हणती सहसा शोक न करिं । गर्गवचनोक्ति अवधारिं ।
त्रैलोक्मयविजयी श्रीमुरारि । न मरे विवरिं कल्पान्तीं ।
ती भयंकर वार्ता ऐकून कृष्णाची आई देवकी जमिनीवर कोसळली. छाती बडवून तिने मोठय़ाने हंबरडा फोडला. ती आक्रंदू लागली-अरे दैवा! हा स्यमंतकमणी कुठून उद्भवला कोण जाणे. ही सारी दैवाची विचित्र करणी! सत्राजित हा काळाचेच रूप मानायला हवा. याच्या स्वार्थाने याने कृष्णावर खोटा आरोप केला. निष्कलंक कृष्ण हा आरोप पुसून टाकण्यासाठी विवरात गेला. त्या विवरात महाविषारी सापांनी गोपाळाला बहुधा डंख मारला असावा. नाहीतर तिथे कुणीतरी भयंकर राक्षस, सिंह, वाघ किंवा अस्वलाने त्याचा जीव घेतला असावा. माझा कृष्ण सुकुमार आहे. माझा कृष्ण अत्यंत सुंदर आहे. माझा कृष्ण अत्यंत चतुर आहे. मग हा त्या भयंकर विवरात का शिरला? देवकी कृष्णाचे गुण, रूप, लावण्य, शौर्य, प्रताप, संभाषण आठवून विलाप करू लागली. ती डोके पिटून आक्रोश करू लागली. रोहिणी व इतर ज्ये÷ स्त्रिया तिची समजूत घालू लागल्या-हे देवकी! असा शोक करू नकोस. गर्गमुनींनी काय सांगितले होते ते आठव. त्रैलोक्मयविजयी श्रीकृष्ण त्या विवरात मरणार नाही, हे नक्की!
ऐसी देवकी शोकाकुळा । ऐकोनि धांवली भीमकबाळा ।
करतळीं पिटोनियां कपाळा । भूमंडळावरी पडली ।
Ad. देवदत्त परुळेकर








