क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
गोवा टेबलटेनिस संघटनेचे सचिव सुरेश शेणवी भांगी यांचे वयाच्या 65व्या वर्षी काल रात्री एका खाजगी इस्पितळात निधन झाले. सांताक्रूझ-कालापूर येथील रहिवासी भांगी यांना ह्दयविकाराचा झटका आल्याने ते कित्येक दिवस इस्पितळात होते. राज्यातील टेबलटेनिस खेळातील प्रशासकीय कामाचा त्यांना चांगला अनुभव होता. त्यांच्या पश्चात पत्नी, पुत्र आणि कन्या असा परिवार आहे. ते स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी कर्मचारी तसेच ढवळी येथील श्री वामनेश्वर देवस्थानचे माजी सचिव होते.
गोव्यात झालेल्या कित्येक राष्ट्रीय तसेच राज्य टेबलटेनिस स्पर्धेचे यशस्वीपणे करण्यात त्यांचा हातखंडा होता. राज्यातील पॅडलर्सच्या विकासात आणि त्यांना त्या खेळात मार्गदर्शन करण्यात त्यांचा वाटा मोलाचा होता. गोव्याच्या टेबलटेनिस खेळाच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान न विसरण्यासारखे आहे, असे गोवा टेबलटेनिस संघटनेचे अध्यक्ष व्हेरो न्युनिस यांनी म्हटलं आहे. टेबलटेनिस संघटनेचे पब्लिक रिलेशन आणि प्रसारमाध्यम समितीचे चेअरमन संदीप हंबळे यांनीही भांगी यांच्या निधनामुळे दुःख व्यक्त केले आहे.









