आरोग्यमंत्र्यांनीही घेतली दखल : 11 कोरोना पॉझिटिव्ह : आज मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा : कोविड हॉस्पिटलमध्येही नाराजी
प्रतिनिधी / मडगाव
शनिवारी आलेल्या राजधानी विशेष रेलगाडीतून 281 प्रवासी गोव्यात आले होते. रविवारी त्यातील 11 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांना मडगावच्या कोविड-19 इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. रविवारी एकाच दिवशी तब्बल 11 कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार घेणाऱयांची संख्या 50 झाली आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी अन्य राज्यांतून कोरोनाबाधित येत असल्याने चिंता व्यक्त केली असून आपण या विषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
राजधानी विशेष रेलगाडीने आत्तापर्यंत 40 हून अधिक कोरोना संक्रमितांना गोव्यात आणले आहे. देशाच्या विविध भागांतून येणाऱया रेल्वे गोव्यासाठी धोकादायक ठरत आहेत, त्यामुळे गोमंतकीयांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. गेले दोन महिने अत्यंत कडकपणे नियमांचे पालन करुन गोवेकरांनी स्वतःचे कोरोनापासून रक्षण केले आहे, मात्र आता रोज येणाऱया रुग्णांमुळे आमची दोन महिन्यांची तपश्चर्या फुकट तर जाणार नाही ना, अशी भीती गोमंतकीय व्यक्त करीत आहेत.
शनिवारी तिरूअनंतपुरम-दिल्ली या विशेष रेलगाडीतून अन्य 26 प्रवासी मडगाव रेल्वे स्थानकावर उतरले होते. त्यांचीही चाचणी घेण्यात आली. परंतु अहवाल येणे बाकी होता. याच रेलगाडीतून 174 प्रवासी पुढच्या प्रवासासाठी निघाले होते.
कोरोनाबाधित तिन्ही कुटुंबे गोमंतकीय की बिगरगोमंतकीय?
काल रविवारी 11 जणांना कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले ते सर्वजण तीन वेगवेगळय़ा कुटुंबातील आहेत. त्यात सात महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. एका 3 ते 4 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. या सर्वाची जलद चाचणी घेतली असता ते पॉझिटिव्ह आढळून आले होते. नंतर गोमेकॉत अंतिम चाचणी घेतली असता त्यावर शिक्कामोर्तब झाले. या तीन कुटुंबातील व्यक्ती या गोमंतकीय की बिगर गोमंतकीय आहेत, याची माहिती मिळू शकलेली नाही.
कोविड हॉस्पिटलमध्येच नाराजीचा सूर
दरम्यान, रेल्वेतून कोरोनाबाधित रूग्ण येणे सुरुच असल्याने कोविड हॉस्पिटलमधून नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला आहे. मूळ गोवेकरांना गोव्यात आणलेच पाहिजे. त्यात ते कोरोनाबाधित असले तरी त्यांच्यावर उपचार करू. परंतु, अन्य राज्यांतील कुटुंबे गोव्यात येतात ती देखील कोरोना पॉझिटिव्ह असतात. ही गोव्यासाठी धोक्याची सूचना असल्याचा सूर कोविड हॉस्पिटलमध्ये व्यक्त होऊ लागला आहे.
कोरोनाबाधित कुठे राहणार ते स्पष्ट व्हायला हवे
बिगर गोमंतकीय कोरोनाबाधित कुटुंबे गोव्यात आल्यानंतर कुठे रहाणार हे स्पष्ट व्हायला पाहिजे. त्यांच्यामुळे कोरोना समाजात फैलावण्याचा धोका देखील कोविड हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
गोव्यात उपचारासाठी येत असावे…
गोव्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर चांगले उपचार केले जातात. गोव्यात एकही रूग्ण दगावलेला नाही असा संदेश पूर्ण भारतभर पोचला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित मुद्दामहून गोव्यात येत असावे अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे. गोव्यात आत्तापर्यंत 16 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. काल आणखी तिघांचे नमूने चाचणीसाठी पुन्हा गोमेकॉत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल जर निगेटिव्ह आला तर त्यांना आज सोमवारी हॉस्पिटलातून डिस्चार्ज दिला जाणार आहे.
गोव्यातील एका हॉटेल चालकाने पर्यटन क्वारंटाईनसाठी गोव्यात यावे, गोवा ग्रीन झोन असल्याची जाहिरात केली होती. त्यामुळे गोव्यात अनेक कुटुंबे सुरक्षित ठिकाण म्हणून येण्याची शक्यता नाकारली जात नाही. मात्र, येणारी जर ही कुटुंबे कोरोना सक्रमित असेल तर गोव्यात कोरोना बाधिताची संख्या वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत आत्ता मिळू लागले आहेत.
बाहेरुन येणाऱया रुग्णांबात आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता
कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढू लागल्याने आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी चिंता व्यक्त केली असून रेल्वे, रस्तामार्गे आणि इतर मार्गे राज्यात येणाऱयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ‘या आजाराला आळा घालण्यासाठी सद्यस्थितीबद्दल थोडक्मयात माहिती मुख्यमंत्र्यांना दिली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गोवा राज्यात प्रवेश करणाऱया प्रवाशांकडून कोविड-19 नकारात्मक प्रमाणपत्र घेऊनच त्यांना गोव्यात प्रवेश देण्यासंदर्भात उपाययोजना राबवण्याची विनंती आपण मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गोव्यातील आतापर्यंतचे एकूण कोरोनाबाधित 66
सध्या उपचार घेणारे कोरोनाबाधित 50
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण 16









