संतोष नानचे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले
वार्ताहर / दोडामार्ग:
कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या सक्शन व्हॅनमध्ये शहरातील मच्छी मार्केटमधील जे घाण व दुर्गंधीयुक्त पाणी भरून ठेवण्यात आले आहे. ते गेले महिनाभर रिकामी करण्यात आलेले नसून त्यामुळे सदर पाणी राहिल्याने ही व्हॅन सडण्याची भीती माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी व्यक्त केली. याबाबत नगरपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
दोडामार्ग नगरपंचायतीने साधारण वर्ष-दोन वर्षांपूर्वी शहरातील नागरिकांसाठी सक्शन व्हॅन खरेदी केली आहे. गोव्यापेक्षा स्वस्त दरात येथील नागरिकांना यांचा उपयोग होईल, असे नियोजन त्यावेळी डोळय़ासमोर ठेवले होते. मात्र, प्रत्यक्षात म्हणावा तसा वापर या सक्शन व्हॅनचा झालाच नाही. आपण स्वतः गेले काही महिने सदर सक्शन व्हॅन नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून द्यावी, अशी वारंवार मागणी वेळप्रसंगी आंदोलनाच्या माध्यमातून देखील केली होती. परंतु नगरपंचायतीचे प्रशासन व पदाधिकारी यांनी या सक्शन व्हॅनकडे लक्ष दिले नाही. काही दिवसांपूर्वी लोकांच्या तक्रारी उद्भवल्याने नगरपंचायतीनजीक असलेल्या मच्छी विक्रेत्यांच्या आसपासच्या घाण पाण्याची योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी आपण नगरपंचायतीकडे केली होती. त्यानुसार प्रशासनाने सक्शन व्हॅनमध्ये सदरचे घाण पाणी सक्शन व्हॅनमध्ये समावून घेतले होते. परंतु गेले महिनाभर सक्शन व्हॅनमधील हे पाणी अद्याप अन्यत्र नेऊन व्हॅन रिकामी करण्यात आलेले नाही. या घाण पाण्यामुळे ही व्हॅन सडण्याची शक्यता असून निदान आता तरी नगरपंचायत प्रशासनाने व पदाधिकारी यांनी ही व्हॅन रिकामी करावी, अशी मागणी नानचे यांनी केली आहे.









