प्रतिनिधी/ दापोली
परराज्यातील कामगार, मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याच्या शासकीय धोरणानुसार दापोली प्रशासनाने शनिवारी 15 ओडीसी तरुणांना त्यांच्या गावी जाण्यासाठी विनामूल्य एसटी बस सेवा उपलब्ध करून दिली.
दापोलीत विविध हॉटेलमध्ये हे युवक कामाला होते. हे सर्वजण लॉकडाऊनमुळे दापोलीत अडकून पडले होते. त्यांनी गावी परत जाण्यासाठी शासनाकडे विनंती केली होती. सायंकाळी सात वाजता ओरिसाला जाण्यासाठी पनवेल येथून एका विशेष ट्रेनचे आयोजन करण्यात आले आहे. या ट्रेनमधून दापोलीतील युवकांना जाता यावे यासाठी शनिवारी दापोली प्रशासनाने त्यांना पनवेल रेल्वेस्थानकावर सोडण्यासाठी एसटी बसची व्यवस्था केली. या सर्व युवकांची बस स्थानकात नोंद करून सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सर्वांना बसस्थानकाच्यावतीने सॅनिटायझर पुरवण्यात आले. बिस्कीटचे पुडे व पाण्याच्या बाटल्यादेखील उपलब्ध करून देण्यात आल्या.
यासाठी आगारप्रमुख वनकुद्रे, नायब तहसीलदार सुरेश खोपकर, तलाठी एच. के. सानप, लेखनिक एस. जे. वराडकर, साने यांचे सहकार्य लाभले.









