वार्ताहर/ संगमेश्वर
कोळंबे येथे काही दिवसापूर्वी कोरोना रुग्ण सापडल्यानंतर या गावाजवळ असलेल्या परचुरी गावात सुध्दा कोरोना रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्याने कोरोना रुग्ण सापडल्यानंतर गावात विविध उपाययोजना सुरु करण्यात आल्या असून तहसिलदार सुहास थोरात यांनी गावाला भेट देवून पहाणी केली.
वाहतुकीची ने आण करणाऱया गाडीवर चालक म्हणून काम करणारा परचुरी गावातील तरुण कर्नाटकला गाडी घेवून गेला होता. तो 11 मेला गावात आला होता. मात्र क्लिनरची चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर त्याच्या मालकाने त्याला परत बोलावून घेवून त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविला होता. त्यानंतर त्याला साडवली येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर त्याला उपचारासाठी कोविड सेंटरला दाखल करण्यात आले आहे. परचुरी गावाला भेट देवून तहसिलदार सुहास थोरात यांनी पहाणी केली. त्यावेळी महेश लिंगायत, सरपंच संतोष लिंगायत, पोलिस पाटील सुधिर लिंगायत आदि उपस्थित होते. गावात आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली असून विविध उपाययोजना करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.









