पालघर/ वृत्तसंस्था
मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकुर हा दोन महिन्यांच्या सक्तीच्या ब्रेकनंतर प्रत्यक्ष मैदानात उतरत सरावाला सुरुवात करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला. 1 कसोटी, 11 वनडे व 15 टी-20 सामने खेळलेल्या शार्दुलने पालघर जिल्हय़ातील बोईसर येथे काही स्थानिक खेळाडूंसमवेत सरावाचा श्रीगणेशा केला.
महाराष्ट्र राज्य सरकारने ग्रीन व ऑरेंज झोनमधील सर्व स्टेडियम्स खुले करण्याची सूचना यापूर्वी केली आहे. फक्त चाहत्यांना प्रवेश देऊ नये, ही सरकारची अट आहे. त्यानंतर सर्वप्रथम शार्दुलने मैदान गाठत सरावाला सुरुवात केली. ‘आम्ही आज सरावाला सुरुवात केली आणि दोन महिन्यांच्या कालावधीनंतर मैदानात उतरणे सुखावह होते’, असे शार्दुल वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला.
पालघर डहाणू तालुका क्रीडा संघटनेने बोईसर येथे नेटसमध्ये सराव सत्राला सुरुवात केली. हे ठिकाण मुंबईपासून 110 किलोमीटर अंतरावर आहे. मागील प्रथमश्रेणी हंगामात रणजी पदार्पण करणारा मुंबईचा फलंदाज हार्दिक तामोरेनेही या सराव सत्रात सहभाग घेतला.
‘सुरक्षिततेचे सर्व उपाय आम्ही काटेकोर अंमलात आणले. गोलंदाजांना चेंडूंचा स्वतंत्र सेट उपलब्ध करुन देण्यात आला. शिवाय, खेळाडू मैदानावर आले, त्यावेळी त्यांचे तापमानही तपासले गेले’, असे एका पदाधिकाऱयाने येथे नमूद केले. यापूर्वी गुरुवारी बेन स्टोक्स, स्टुअर्ट ब्रॉड व ख्रिस वोक्स हे ब्रिटीश खेळाडू सराव सुरु करणारे जागतिक स्तरावरील पहिले खेळाडू ठरले होते.









