प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार लॉकडाऊन नियम शिथिल करताना शुक्रवारी एसटी सेवेला जिल्हय़ात प्रारंभ झाला. मात्र पहिल्या दिवशी प्रवशांचा अत्यल्प प्रतिसाद लाभला. विविध नियमांमुळे दुपारपर्यंत एकही गाडी सुटली नव्हती. सायंकाळनंतर 52 पैकी केवळ 18 बसच धावल्याची माहिती रत्नागिरी एस. टी. विभागाने दिली आहे. खेड, दापोली व राजापूरच्या बस आगारातच होत्या.
प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेत जिह्यात बस सेवा सुरु करण्यास जिल्हाधिकाऱयांनी अनुमती दिली होती. त्यानुसार एसटी प्रशासनाने एकूण 52 गाडय़ांचे नियोजन केले होते. मात्र शुक्रवारी सकाळपासुन एकही प्रवासी बस स्थानकात फिरकला नाही. त्यामुळे 22 प्रवासी आल्याशिवाय गाडी सोडली जाणार नाही असा फलक रत्नागिरी बसस्थानकाबाहेर लावण्यात आला होता. त्यामुळे दुपारपर्यंत गाडय़ा रहाटाघरमध्येच होत्या त्यानंतर हळूहळू प्रवासी येवू लागल्यानंतर गाडय़ा सोडण्यात आल्या. जिल्हय़ातही हीच परिस्थिती होती जिल्हय़ातील राजापूर, पाली, खेड, दापोलीतून एकही गाडी सुटली नाही. तर चिपळूणमधून 1, मंडणगड 1, गुहागरमधून 3, देवरूखमधून 3, रत्नागिरीतून 4 आणि लांजातून 6 बसेस सोडण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
रत्नागिरीतुन दापोली, चिपळूण, राजापूर, नाटे आणि जयगड या मार्गावर थेट 22 प्रवासी उपलब्ध झाल्यावरच बस सोडण्यात येईल असा बोर्ड रहाटघर बसस्थानक येथे लावण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्यात थोडा बदल करून दहाच्या वर प्रवासी आल्यानंतर गाडय़ा सोडण्यात आल्या.
नियम-अटींमुळे अनेकजण माघारी अनेक स्थानकांमध्ये प्रवासी बससाठी दाखल झाले होते. मात्र प्रवास करणापूर्वी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असल्याची सूचना प्रवाशांना देण्यात आली. तसेच वैद्यकीय प्रमाणपत्रासोबत आधार कार्ड, मास्क व सॅनिटायझरदेखील असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. या कागदपत्रांची जमवाजमव करणे शक्य नसल्याने अनेकजण माघारी परतल्याचे चित्र होते









